Wedding Custom : आधुनिक काळातही लग्नातील शिदोरी प्रथा टिकून | Wedding Custom modern times Shidori custom in weddings survived nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Archive photo of shidori being served at a wedding ceremony

Wedding Custom : आधुनिक काळातही लग्नातील शिदोरी प्रथा टिकून

Wedding Custom : लग्नसोहळ्यात अनेक बदल झाले असले तरी काही जुन्या प्रथा परंपरा आजही जोपासल्या जात आहेत. सध्याच्या झगमगाट युगात करोली, काकन कोयते, हळद फेडणे, वरमाया, सुक्या, देवदर्शन आदींचे पालन होतच आहे. यासह लग्नानंतर वधू-वर पक्षाकडून पाठविण्यात येत असलेली शिदोरीची प्रथा तितकीच जोपासली जात आहे.

पूर्वीच्या काळी भाकर, चटणी, खुडा, कांदा अशी शिदोरी असायची. नंतर याची जागा पुरणपोळी, सांजोरी, पापडी, चिवडा, बर्फी आदींनी घेतली. आताच्या आधुनिक युगात शेव, पापडी, लाडू, पेढे, काजू कतली, तूप व दुधाचे महागड्या पदार्थांनी शिदोरीत जागा मिळविली आहे. (Wedding Custom modern times Shidori custom in weddings survived nashik news)

पूर्वीच्या काळी विवाह एप्रिल व मे या दोन महिन्यात प्रामुख्याने होत असत. त्या काळात पायी व बैलगाडी असाच प्रवास केला जात असे. आठ दहा महिने वाहणाऱ्या नद्या एप्रिल मे मध्ये कोरड्या असायच्या. त्यामुळे नदीतून वऱ्हाडींना प्रवास करणे सोयीचे जायचे.

इतर कोणतीही वाहने नसल्याने बैलगाडी हे एकमेव माध्यम होते. छोट्याशा प्रवासाला सुद्धा एक ते दोन दिवस लागायचे. बैलगाडीने वऱ्हाड निघायचं अन् विवाहस्थळी जायचे. मजल दर मजल करीत हा काफिला चालायचा.

लग्न झाल्यानंतरही नवरीची पाठवणी देखील बैलगाडीद्वारे करत. लग्नानंतर मुलगी सासरी नांदायला जातांना तिच्या सोबत सांजोरी व पुरळपोळी दिली जाई.

अलीकडच्या काळात झालेली भौतिक प्रगती लग्न सोहळ्यात दिसायला लागली अन शिदोरी देखील आधुनिक झाली. पूर्वीच्या काळी बैलगाडीने प्रवास होत असल्याने मध्येच कुठेतरी मुक्काम करावा लागायचा.

त्यामुळे नवरीला घ्यायला आलेल्या मुराळीसोबत सुका 'शिधा' दिला जाई हा एक अर्थ शिदोरी देण्यामागे असायचा. एखाद्या घरची सून माहेराहून सासरी आल्यावर आसपासच्या लोकांना कसे कळणार? त्यासाठी देखील नवरी मुली सोबत शिदोरी पाठवली जात असे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ती शिदोरी बघण्यासाठी आसपासच्या महिलांना बोलविले जात. शिदोरी सोडण्याच्या निमित्ताने जवळच्या नात्यातील सगळ्या स्त्रिया एकत्र येत.

आता काळ बदलला, परिस्थिती बदलली. प्रवासाची साधने बदलली तसेच शिदोरीकडे पाहण्याची भूमिकाही बदलली. ग्रामीण भागामध्ये ही प्रथा आजही कायम आहे. शिदोरी आता प्रतिष्ठेची झाली आहे. शिदोरी ५, ११, २१ व ५२ प्रकारची असते.

आता हीच शिदोरी हायटेक झाली असून महागडे पदार्थ यात समाविष्ट झाले आहे. या प्रथेच्या माध्यमातून आपल्या लोकसंस्कृतीने अनेक गोष्टी साधलेल्या दिसून येतात. अलीकडच्या काळात सांजोरी, पुरणपोळी सोबत जिलेबी किंवा तत्सम गोड पदार्थ 'शिदोरी' म्हणून देण्याची पद्धत घट्ट रोवली गेली आहे.

"पूर्वी आमच्या काळी शिदोरी एका टोपलीत दिली जायची. त्यामध्ये लाडू, करंजी, पुरणाच्या पोळ्या असे अनेक प्रकारचे पदार्थ भरून नववधूच्या सासरी पाठवली जात होते. पूर्वी ठराविक पदार्थ शिदोरीत असायचे. आता शिदोरीत ननाविध प्रकारच्या गोड-धोड पदार्थांचा यात समावेश झालेला आहे." - कमलबाई खैरनार