दिव्यांग मुलीशी विवाह; पदवीधर युवकाने ठेवला आदर्श! चर्चेचा विषय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wedding with physically disabled girl

पदवीधर तरुणाने बांधली दिव्यांग मुलीशी रेशीमगाठ!

वडेल (जि.नाशिक) : रेशीमगाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण तरीही हुंडा, मानपान, शिक्षण व रंगरूप या क्षुल्लक बाबींवरून अनेकदा जमलेले लग्न मोडल्याच्या घटना आजूबाजूला घडत असताना रामपुरा (ता. मालेगाव) येथील प्रशांत सोनवणे या पदवीधर तरुणाचा मूकबधिर मयूरीशी विवाह करण्याचा निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. (wedding-with-physically-disabled-girl-by-graduate-youth-nashik-marathi-news)

पदवीधर तरुणाने बांधली दिव्यांग मुलीशी रेशीमगाठ; तरुणांसमोर आदर्श

पूर्वाश्रमीची मोनाली दिगंबर निकम ही प्रशांतच्या सख्ख्या मामाची अर्थात वजीरखेडे येथील दिगंबर निकम यांची कन्या. प्रशांतने दिव्यांग मयूरीशी बांधलेली रेशीमगाठ आदर्शवत आहे. रामपुरा (ता. मालेगाव) येथे आजोबा रामदास सोनवणे यांच्याकडे बालपण गेलेल्या मोनालीला बोलण्यात अडचणी येत होत्या. शब्द फुटत नव्हते. अशातच तिचे आजोबा रामदास सोनवणे यांनी तिला गावातील प्राथमिक शाळेत दाखल केले. सुंदर हस्ताक्षर असलेल्या मोनालीला शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. कांबळे यांनी तिच्या आजोबांच्या संमतीने कुसुंबा (जि. धुळे) येथील अंकुर मूकबधिर संस्थेत दाखल केले. तिथे मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी शाळेत तिने दहावीपर्यंत विशेष शिक्षण घेतले.

कुटुंबीयांकडून निर्णयाचे स्वागत

प्रशांतनेही रामपुरा येथे प्राथमिक शिक्षण घेऊन माध्यमिक शिक्षण कजवाडे येथून, तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. विशेष म्हणजे तो सात बहिणींचा एकुलता भाऊ असून, होतकरू शेतकरी आहे. प्रशांत व मोनालीच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा कुटुंबातील सर्वांनी त्याला पाठिंबा दिला. तरीही प्रशांतच्या अंतिम निर्णयामुळे मोनालीचा संसार उभा राहिला असून, पूर्वाश्रमीची मोनाली निकम आता प्रशांतशी विवाहबंधनाची गाठ बांधल्यामुळे मयूरी सोनवणे झाली आहे. परिसरात व नातलगांमध्ये या विवाहाची चर्चा होत असून, प्रशांतसह त्याच्या कुटुंबीयांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. निसर्गत:च दिव्यांग असलेल्या मोनालीशी प्रशांतने बांधलेली रेशीमगाठ तरुणांपुढे आदर्श निर्माण करणारी आहे.

प्रशांत व मोनाली या नवविवाहित दांपत्याने नवीन पिढीपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या विवाहामुळे पैसा, सौंदर्य, हुंडा या गोष्टींकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार आहे. -रामदास सोनवणे, मयूरीचे आजोबा

सोनवणे व निकम या दोन्ही कुटुंबांचा प्रशांत व मयूरीच्या विवाहाला होकार असला तरी अंतिम निर्णय प्रशांतचा होता. त्याने योग्य निर्णय घेऊन मयूरीला साथ दिली व तिनेही विवाहाला संमती दिली हे कौतुकास्पद आहे. -शिवाजी सोनवणे, प्रशांतचे वडील