Latest Marathi News | दुभाजकातील झाडांना तारांचा फास; झाडांना खिळे, लोखंडी तारा बांधून जाहिरातबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iron wire tied to trees

Nashik : दुभाजकातील झाडांना तारांचा फास; झाडांना खिळे, लोखंडी तारा बांधून जाहिरातबाजी

नाशिक : शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या दुभाजकातील झाडांना लोखंडी तारांचे फास लावल्याचे पाहायला मिळत आहे. विविध राजकीय पक्ष, संघटना त्यांच्या पक्षाचे झेंडे लावण्यासाठी झाडांच्या तारांचा उपयोग करतात. वेळ संपल्यानंतर केवळ ध्वज काढून घेतात मात्र, झाडांचा तारांचा फास तसाच ठेवतात. (wire rope to trees in dividers Advertising by tying nails and iron wire to trees Nashik Latest Marathi News)

नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रस्ता दुभाजकातील अनेक झाडांना असे लोखंडी तारांचे फास आवळले आहेत. चौफेर विस्तारलेल्या शहरात प्रत्येक रस्त्यावर हेच चित्र आहे. त्यामुळे स्वतःच्या पक्ष आणि संघटनांचा प्रचार करण्यासाठी झाडांना फास लावण्याचे हे प्रकार वाढत आहे. त्यातून झाडांचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. केवळ राजकीय पक्षाचा किंवा संघटनाच नव्हे तर त्यांचे पाहून जाहिरातीचे फलक बॅनर लावण्यासाठी झाडांचा उपयोग केला जाऊ लागला आहे.

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एबीपी सर्कलपासून तर सातपूर महेंद्र सर्कलपर्यंत आणि नाशिकमध्ये विविध ठिकाणी दुभाजकात लावलेल्या झाडांभोवती असे फास आढळून येतात. याचा उपयोग विविध प्रकारे आपल्या नेते मंडळीच्या स्वागतासाठी विविध पक्ष आणि संघटना याचा उपयोग करतात. तपोवनात टाकळी ते तपोवन, नाशिक- पुणे, औंरगाबाद महामार्गासह शहरातील महापालिकेच्या झाडांवर मोठ्या प्रमाणावर फास लावलेले आहे. झाडांना खिळे आणि लोखंडी तारा बांधून त्यावर जाहिरात फलक लावण्याचे हे पेव आता शहरातील विविध प्रभागातील रस्त्यावरील चौकावर सुरू झाले आहे.

कष्टाने जगविलेली झाड मृतावस्थेत

झाडावर किंवा त्यांच्या आश्रयाने लावलेले झेंडे काढले जातात, पण तारा मात्र तशाच ठेवल्या जातात. तारांमुळे झाडांची साल कापली जाते. त्यातून झाडाला अन्नपुरवठा पुरवठ्याची साखळी खंडित होऊन झाडांना इजा पोचून अनेक वर्षे कष्टाने जगविलेली झाड मृतावस्थेत जातात. कार्यक्रम एक दिवसाचा असतो पण त्यातून झाडांचे मात्र वाटोळे होते. त्यामुळे झेंडे काढतात त्याप्रमाणे लोखंडी तारा, खिळे काढले जावेत. हीच पर्यावरणप्रेमीची मागणी आहे.

झाडांचा असाही वापर

- झाडांच्या बुंध्याजवळचे साल काढणे
- लोखंडी तारांना झाडांचे बुंधा बांधून ठेवणे
- झाडांच्या बुंध्याभोवती काँक्रिट, पेव्‍हर ब्लॉक
- झाडांवर खिळे ठोकून जाहिरात फलकासाठी

"शहरांत झाडांचा उपयोग फक्त जाहिरातीद्वारे उदोउदो करून घेण्यात, झेंडा लावण्यासाठी करण्यात येत आहे. निदान कार्यक्रम झाल्यावर या फासातून मुक्त करण्याचे गांभीर्य ठेवाल तर ते झाड ऋणी राहील. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे."

- शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमी, आपलं पर्यावरण