esakal | .....अन् तासाभरात लाख रुपये खात्यात परत? नेमका प्रकार काय?

बोलून बातमी शोधा

cyber crime 1.jpg

इंडियाबुल्स कंपनीतील कर्मचारी रमेश वाजे यांना मोबाईलवर एकाने मोबाइलवर पेटीएमची केवायसी अपडेट करा नाही, तर आपले पेटीएम खाते बंद पडेल, असा संदेश व्हॉट्‌सऍपवर पाठवत त्याबरोबर एक लिंकही पाठवली..त्यानंतर...

.....अन् तासाभरात लाख रुपये खात्यात परत? नेमका प्रकार काय?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सायबर क्राइमच्या माध्यामतून लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल होताच नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी अवघ्या एका तासात तक्रारदाराचे लाख रुपये पुन्हा मिळवून दिले. 

असा झाला प्रकार....

नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी प्रशंसनीय कामगिरी करत अवघ्या एका तासात डुबेरे येथील रमेश वाजे यांची सायबर गुन्हेद्वारे चोरी झालेली एक लाख 23 हजार 800 रुपयांची रक्कम परत करत वेगवान कामगिरी केली. 
डुबेरे (ता. सिन्नर) येथील इंडियाबुल्स कंपनीतील कर्मचारी रमेश वाजे यांना शनिवारी (ता.15) दुपारी बाराला मोबाईलवर एकाने मोबाइलवर पेटीएमची केवायसी अपडेट करा नाही, तर आपले पेटीएम खाते बंद पडेल, असा संदेश व्हॉट्‌सऍपवर पाठवत त्याबरोबर एक लिंकही पाठवली. या वेळी श्री. वाजे यांनी त्या लिंकची जास्त माहिती न घेता त्यावर आपली संपूर्ण माहिती व क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती भरली. त्यानंतर काही वेळातच श्री. वाजे यांच्या एचडीएफसी क्रेडिट कार्डवरून एक लाख 23 हजार 800 रुपये वापरण्यात आल्याचा संदेश त्यांना प्राप्त झाला. यानंतर श्री. वाजे यांना आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच आपले बंधू विनायक वाजे यांना संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. 

नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी 

विनायक वाजे यांनीही तातडीने भावासह पोलिस ठाणे गाठत सायबर पोलिस अधिकारी सुभाष अनमुलवार यांच्याकडे तक्रार नोंदविली. पोलिस अधिकारी यांनीदेखील तातडीने यांसदर्भात तपासाची चक्रे फिरवत सायबर गुन्हे शाखेने प्रमोद जाधव, परिक्षित निकम यांनी तत्काळ रमेश वाजे यांच्या खात्याची तांत्रिक माहिती घेऊन संबंधित फ्लिपकार्ट नोडल यांच्याशी संपर्क साधत फसवणूक झालेल्या रकमेचे ट्रान्जेक्‍शन थांबविण्यास सांगितले. फ्लिपकार्ट नोडल अधिकारी यांनी पोलिसांनी सांगितलेल्या माहितीवरून हा व्यवहार थांबवत संपूर्ण रक्कम वाजे यांच्या खात्यात पुन्हा वर्ग केली. आपल्या खात्यावरून गेलली रक्कम पुन्हा मिळताच रमेश वाजे यांच्या जिवात जीव आला. 

हेही वाचा > म्यानातून उसळे तलवारीची पात!...13 फुटी भव्य 'तलवार' वेधतेय नाशिककरांचे लक्ष...

डिजिटल साक्षरता प्रत्येकाने जपायला हवी

व्हॉट्‌सऍप मेसेजवर आलेल्या आर्थिक व्यवहारातील लिंक ओपन करू नका. मोबाईलवर आलेला ओटीपी असा लिंकमध्ये भरू नका. डिजिटल साक्षरता प्रत्येकाने जपायला हवी. - विनायक वाजे (तक्रारदार) 

अनोळखी फोन, व्हॉट्‌सऍप, सोशल मीडियावरील मेसेजवर विश्‍वास ठेवून आपल्या वैयक्तिक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये, कोणतीही बॅंक माहिती फोनवर विचारत नाही. आपल्याबरोबर कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाणे किंवा सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. - डॉ. आरती सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक 

हेही वाचा > PHOTO : कटला, सुरमई, पापलेट, वाम...अरे वाह! 'इथं' तर माशांची मेजवानीच!...पण, कोरोना?