
नाशिक : वैशाली मिशाळ मूळच्या खानदेशातल्या, त्यांच्या आजीमुळे त्यांनी धार्मिकतेची गोडी निर्माण झाली होती. त्यांनी ‘सकाळ’ शी संवाद साधताना त्यांच्या पौरोहित्याच्या प्रवासाविषयी वर्णन केले. आजही वयाच्या ७० व्या वर्षीही चार ते पाच तास एका ठिकाणी बसून पूजा करवून घेणे ही केवळ मंत्रोच्चाराची जादूच आहे, असे त्या म्हणाल्या. (Latest Marathi News)
वैशाली मिशाळ यांचे माहेर जळगावचे, आजीला प्रवचनासाठी तसेच पूजेअर्चेसाठी ने- आण करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावरच असे.
तसेच माहेरी कुळधर्म, कुळाचार यथासांग होत. सासर अंमळनेरचे त्यामुळे खानदेशातील पंचक्रोशीत त्याचे सासरे मिशाळ गुरुजी प्रसिद्ध होते. आसपासच्या गावात ते पूजेसाठी आवर्जून जात. सासरचे सारे वातावरण हे पौरोहित्याचे. त्यामुळे पती नोकरीसाठी एचएएल येथे असल्याने नाशिक रोड येथे स्थित झाल्यावर राणी भवन येथे २००४ मध्ये प्रथम वर्गास प्रवेश घेतला. श्रीमती विनया तसेच परांजपे यांच्याकडे शिक्षण घेतले. तसेच, वेदोक्त शिक्षणासाठी श्रीमती दुगल यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच यज्ञयाग, सामूहिक पठण, स्वाहाकार यात साने गुरुजी मार्गदर्शन करतात. गुरूंचे मार्गदर्शन हे प्रत्येक शिष्यासाठी प्रगतिपथावर नेणारे ठरते. श्री सुक्त, पुरुष सुक्त, महिन्म हे प्राणायामाचेच भाग आहे. त्यामुळे जीवन आरोग्यदायी होते.
घरातून विशेषतः त्यांच्या पतीकडून सहकार्य व पाठिंबा त्यांना मिळाला. मंत्रोच्चार मुळे नकारात्मक विचारांना अजिबात थारा नसतो. त्यामुळे जीवनशैलीतील सकारात्मकता वाढून जीवन सुखकर होते. पौरोहित्य करतानाच्या अनुभवात एके ठिकाणी सत्यनारायण पूजा सांगितली असता श्रोते मंडळीतील सर्वांनीच त्यांचे कौतुक केले तसेच वकील, इंजिनिअर, पीएच. डी. झालेल्या गृहस्थांनी दरवर्षीच्या पूजेसाठी आमंत्रण दिले. तो क्षण अतिशय प्रसन्नदायी होता. तसेच मंत्राच्या जादूनेच सत्तरीत असलेल्या वैशाली मिशाळ तेवढ्याच जोमाने पूजा सांगत आरोग्यदायी जीवन जगत आहेत.