टुडे २ मेन फिचर
महिला-बालविकास विभागाच्या योजनांत मोठे बदल
(उपशीर्षक)
नऊ लोकसेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवरून वगळणार; चार योजना बंद, लेक लाडकी महाडीबीटीवर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : महिला व बालविकास विभागाच्या सेवा आणि योजनांच्या अंमलबजावणीत सुसूत्रता आणण्यासाठी राज्य शासनाने काही बदल केले आहेत. शासकीय प्रक्रिया पुनर्रचना अंतर्गत १६ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार विभागाच्या दहा अधिसूचित लोकसेवांपैकी नऊ सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवरून वगळण्यात येणार आहेत. तसेच काही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महिला व बालविकास विभागाच्या योजनांमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
महिला व बालविकास विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने बदल करण्यात आले आहेत. काही सेवांसाठी ऑनलाइन यंत्रणा विकसित होईपर्यंत ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया आणि योजनांच्या सद्यःस्थितीबाबत विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक असेल.
‘लेक लाडकी’ महाडीबीटीवर
लेक लाडकी योजना आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. पोर्टल सुरू होईपर्यंत बालसंगोपन योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करता येणार आहेत. तर विभागाच्या दहा अधिसूचित लोकसेवांपैकी नऊ सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवरून वगळण्यात आल्या आहेत. मात्र, अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्याची सेवा सुरू राहणार असून या सेवेसाठी सध्या ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातील. ऑनलाइन पोर्टल विकसित झाल्यानंतर अर्जाची प्रक्रिया पुन्हा ऑनलाइन केली जाईल.
अंगणवाडी सक्षमीकरणावर भर
अंगणवाडी केंद्रांतील मूलभूत सुविधा सुधारण्यासोबत बांधकाम आराखड्यात बदल, वीज सुविधा उपलब्ध करणे आणि पोषण ट्रॅकरवर साहित्याची नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालकांच्या बीएमआय तपासणीसाठीही पाठपुरावा करण्यास सांगण्यात आले आहे. तर महिला हेल्पलाइन १८१ वरील संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी स्वतंत्र दूरध्वनी लाइन्स करण्याचे निर्देश आहेत.
इन्फो
चार योजना बंद करण्याचा निर्णय
शासन निर्णय काढलेल्या दिनांकापासून महिलांसाठी बहुउद्देशीय समाज केंद्र, महिला प्रशिक्षण केंद्रांना अनुदान, देवदासींच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी अनुदान आणि अंगणवाडी केंद्रांना सौरऊर्जा संच पुरविण्याच्या योजना बंद करण्यात येत आहेत. या निर्णयामुळे संबंधित योजनांच्या अंमलबजावणीत बदल होणार आहेत. तर माझी कन्या भाग्यश्री योजनेतील लाभार्थ्यांची प्रलंबित देयके मार्च २०२७ अखेरपर्यंत अदा करण्याचे निर्देश आहेत.
––––––––