दिलासादायक! येवला, दिंडोरी, इगतपुरी कोरोनामुक्त | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona free

दिलासादायक! येवला, दिंडोरी, इगतपुरी कोरोनामुक्त | Nashik

येवला (जि. नाशिक) : गेले दोन वर्ष कहर चालविलेल्या कोरोनाने (Corona) अखेर आपला गाशा गुंडाळला आहे.अर्थात चौथ्या लाटेची धास्ती अजूनही असून अशा भीतीच्या वातावरणातही येवला, बागलाण, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, त्र्यंबकेश्वर जिल्ह्यातील हे सात तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. आजमितीस ६९ रुग्ण मात्र बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: Corona Update : निर्बंधांचाही ‘मार्च एंड’

पहिल्या लाटेत मालेगाव, येवल्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. दुसऱ्या लाटेत नाशिक शहराला कोरोनाचा विळखा पडला तर जिल्ह्यातही येवला, सिन्नर, निफाड आदी तालुक्यामध्ये कोरोना आटोक्यात आणणे जिकिरीचे बनले होते. अशा परिस्थितीत दिवाळीपासून आशेचा किरण दिसला असून रुग्ण संख्या हळूहळू कमी होत गेली आहे. सद्यस्थितीत तर सात तालुके शून्यावर पोहोचल्याने प्रशासन, आरोग्य विभागासह नागरिकांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे. असे असले तरी काही देशात आलेल्या चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर भीतीचे वातावरण देखील असून यंत्रणेने चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त केल्याने कोरोची दहशत मात्र अनेकांच्या मनात अजूनही घर करून आहे.

हेही वाचा: Corona : भय संपलेले नाही! WHO ने दिला इशारा

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार आत्तापर्यंत जिल्ह्यातील ४ लाख ७५ हजार ९९५ जण कोरोना बाधित झाले आहेत. यातील ४ लाख ६७ हजार कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत ६९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आत्तापर्यंत ८ हजार ८९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये येवला, बागलाण, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, त्र्यंबकेश्वर हे तालुके कोरोनामुक्त झाल्याचा आनंद घेत आहे. नाशिक ५, चांदवडला १, देवळात १, नांदगावला १, निफाडला ५, पेठला २,सिन्नरला २, सुरगाणात ३ असे एकूण २० पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. नाशिक महानगरपालिका (NMC) क्षेत्रात ४६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ०० तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण असून असे एकूण ६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

रिकव्हरी रेट ९८ टक्के

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमधे ९७.५६ टक्के, नाशिक शहरात ९८.४८ टक्के, मालेगाव मध्ये ९७.३८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.४५ टक्के. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण सरासरी ९८.१२ इतके आहे. कोरोनाने अनेकांचे बळी देखील घेतले आहे. आत्तापर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये ४ हजार ३०४,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार १०५, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ३६४ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ८९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नियम धाब्यावर बसवू नका!

रुग्णसंख्या कमी होऊन एखाद-दोन बाधित निघत असल्याने नागरिकही आता बिनधास्त झाले आहेत. यामुळे कोरोनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवले जात असून कोणीही मास्क वापरताना दिसत नाही तसेच सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग, हात धुणे या पर्यायांचा देखील हळूहळू नागरिकांना विसर पडतो की काय अशीही भीती व्यक्त होत आहे. कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नसल्याने नागरिकांनी अधिकाधिक नियमांचे पालन करावे असे आवाहन येथील आरोग्य विस्तार अधिकारी राजेंद्र खैरे यांनी केले आहे.

Web Title: Yeola Dindori Igatpuri Became Corona Free

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..