27388
येवला : धडपड मंचच्या वतीने लावण्यात आलेला आकाश कंदील.
धडपड मंचच्या वतीने
येवला शहरात मोठा आकाश कंदील
सकाळ वृत्तसेवा
येवला,ता. २ : प्रकाशाचा आणि आनंदाचा सण असलेल्या दिवाळीचे औचित्य साधून शहरातील अग्रगण्य धडपड मंच या स्वयंसेवी संस्थेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आकर्षक अशा पारंपरिक आकाश कंदील लावण्यात आला आहे.
दिवाळी म्हटलं की लख्ख दिव्यांचा प्रकाश, रंगबिरंगी पणत्या, आकाशकंदील यांनी घरदार प्रज्वलित करून प्रकाशमय असं वातावरण दिवाळीत तयार होते. घरासोबत शहराचे देखील सौंदर्यात भर पडावी यासाठी व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या नियोजनाखाली गेल्या २० वर्षांपासून येथील धडपड मंचच्या वतीने शहरातील मेनरोडवर आकर्षक असा आकाश कंदील लावण्यात येतो.
मांगल्याचे प्रतीक असणारा दीपावली हा सण दीपोत्सवाने उजळून टाकला जातो. दीपावलीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करण्याचा सर्वांचाच प्रयत्न असतो. येथील धडपड मंचच्या वतीने दरवर्षी शहरातील मेनरोडवर मध्यवर्ती भागात लावलेला आकर्षक असा भव्य आकाश कंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कंदील उजळवण्यासाठी अत्याधुनिक पण कमी ऊर्जा खाणाऱ्या दिव्यांचा वापर करण्यात आला असून यामुळे रात्रीच्या वेळी हा कंदील अतिशय विलोभनीय दिसतो.
या कार्यात मयूर पारवे, दत्ता कोटमे, मुकेश लचके, गोपी दाणी, शुभम सुकासे, सुभाष निकम आदींनी सहकार्य केले.