
Police Peace Committee : शांतता समितींमध्ये मिळणार युवकांना संधी; पोलिस आयुक्तांची संकल्पना
नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सामाजिक सलोखा जपण्याची मुख्य जबाबदारी ही पोलिस यंत्रणेवर असते. यासाठी आयुक्तालयातील १३ पोलिस ठाणेनिहाय शांतता समिती असतात.
या समितीमध्ये त्या-त्या परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असतो. मात्र, समाजात असलेल्या नवयुवकांनाही सामाजिक बांधिलकी व नागरिकत्वाची जाणीव व्हावी, या प्रमुख उद्देशाने शांतता समितीमध्ये नवयुवकांना समाविष्ठ करून घेतले जाणार आहे.
या नवयुवकांमध्ये त्यांच्या हक्कांसह सामाजिक जाणीवा वृद्धींगत करण्यासाठी विविध उपक्रम पोलिस आयुक्तालयामार्फत राबविले जातील. नवयुवकांना सामाजिक भान येण्यासाठीची ही अभिनव संकल्पना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची असून, लवकरच त्यास मूर्त स्वरूप दिले जाणार आहे. (Youth will get opportunity in peace committees Concept of nashik Police Commissioner ankush shinde nashik news)
शहरात साजरे होणारे धार्मिक -सामाजिक उत्सव हे शांततेत आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित न होता उत्साहात साजरे करण्याची जबाबदारी जशी पोलिसांची असते, तशीच ती सामाजिकही असते.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, महापुरुषांच्या जयंतींसह विविध धार्मिक सण उत्सव साजरे केले जातात. साऱ्या उत्सवांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी शहर पोलिसांची असते.
अशा सण-उत्सवांपूर्वी शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमधील १३ पोलिस ठाणेनिहाय असणाऱ्या शांतता समितींच्या बैठका घेतल्या जातात. या समितीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील त्या -त्या परिसरातील मान्यवरांचाही समावेश असतो. या बैठकींमध्ये आगामी उत्सवासंदर्भातील सूचना देताना समिती सदस्यांची मतेही जाणून घेतली जातात.
परंतु, याच शांतता समितींमध्ये नवयुवकांचा अभाव असतो. आगामी सण-उत्सव, विविध कार्यक्रमांमध्ये नवयुवकांचा समावेश अधिक असतो. त्यामुळे याच नवयुवकांना त्या शांतता समितींमध्ये समाविष्ठ करून त्यांना संधी दिली पाहिजे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
त्याअनुषंगाने नवयुवकांना त्यांच्या जबाबदारीचीही जाणीव होऊ शकेल. तसेच, त्यांचेही सामाजिक भान अधिक प्रगल्भ होण्यास मदत होऊ शकेल, अशा स्वरुपाची पोलिस आयुक्त शिंदे यांची संकल्पना आहे.
१८ ते २५ वयोगटातील युवकांना संधी
पोलिस आयुक्तांच्या संकल्पनेनुसार शांतता समितीमध्ये १८ ते २५ वयोगटातील युवकांना संधी मिळणार आहे. तसेच, समितीमध्ये समाविष्ठ करण्यात येणाऱ्या युवकांसाठी आयुक्तालयाच्या वतीने त्यांच्या सामाजिक जबाबदारी आणि जाणीवा अधिक प्रगल्भ करण्याच्या उद्देशाने कार्यशाळा घेतल्या जातील.
सामाजिक स्तरावरील विविध प्रवाहांशी संबंधित असलेल्या वक्त्यांकडून या युवकांना मार्गदर्शन केले जाईल. तसेच, प्रशासकीय, राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक क्षेत्रात असलेल्या मान्यवरांच्या कार्यशाळेतून या युवकांना त्यांच्या सामाजिक, बौध्दिक जाणीवा विस्तारीत होण्यास वाव मिळेल.
यातूनच या युवकांना सामाजिक भान येऊन ते निर्णायक भूमिका घेण्यास सज्ज असतील, असा यामागील उद्देश आहे.
"नवयुवकांना त्यांच्या योग्य वयात त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे. सामाजिक भान असेल तरच स्वत:चे मत मांडता येते. त्यासाठी या युवकांना संधी मिळाली पाहिजे. शांतता समितीच्या माध्यमातून नवयुवकांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्यासाठी कार्यशाळा घेतल्या जातील. त्यातून त्यांना विविध सामाजिक प्रवाहांची माहिती मिळू शकेल. यातूनच ते जबाबदारी नागरिक बनतील, जे समाजासाठी अत्यंत गरजेचे असेल."
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक.
तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः । पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः
जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्धस्वरूप आत्म्याला कर्ता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही. असे आताच्या युवकांच्या बाबतीत होऊ नये, बरे- वाईट काय ते त्यांना कळावे, सामाजिक जाणीव व्हावी, यासाठीच आयुक्त अंकुश शिंदे यांची वरील अभिनव संकल्पना आहे.