
ZP VS NMC : जिल्हा परिषदेची महापालिकेवर कुरघोडी; परवानगी न घेताच शाळांची तपासणी
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत महापालिका हद्दीतील खासगी व सरकारी शाळांची तपासणी सुरू केल्याने यावर महापालिकेने हरकत नोंदवली आहे. महापालिकेची परवानगी घेतल्याशिवाय तपासणी करू नये, अशा सूचना दिल्या. (Zilla Parishad nashik surpassed NMC Inspection of schools without permission nashik news)
ग्रामीण भागात जिल्हा परिषद, तर शहरांमध्ये महापालिकेची शाळांवर नियंत्रण असते. शाळांची तपासणी करण्यासाठी दोन्ही संस्थांचे स्वतंत्र अधिकार आहे. नाशिक महापालिका हद्दीमध्ये एकूण ३४० शाळा आहे.
या शाळांचे नियंत्रण महापालिकेकडे आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांची वार्षिक तपासणी सुरू केली, या संदर्भात महापालिकेला कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही.
शाळांमध्ये वार्षिक तपासणी करण्याचे अधिकार महापालिकेच्या शिक्षण विभागाचे असतानाही परस्पर तपासणी केल्याने त्यावर महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक अधिकाऱ्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.
तीन शाळा अपात्र
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जानेवारी महिन्यात शाळांची वार्षिक तपासणी केली. ३४० शाळांपैकी १६ शाळा मान्यता प्राप्त नसल्याचा अहवाल महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे दिला. महापालिकेच्या शिक्षण विभागाने १६ शाळांकडे मान्यतेची कागदपत्रे मागितली.
यातील १३ शाळांनी कागदपत्रे सादर केले. वडाळा येथील खैरुल बनात इंग्लिश मीडियम स्कूल, जेल रोड येथील एमराल्ड हाइट्स इंटरनॅशनल स्कूल, चुंचाळे येथील वंशराजे हिंदी माध्यमिक या तीन शाळा अनधिकृत जाहीर करण्यात आल्या.