ZP Super-100 : माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना डावलून ‘सुपर-100’! 6 सदस्यांची समिती राबविणार योजना | ZP Super100 by leaving secondary education officers committee of 6 members will implement plan nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik ZP News

ZP Super-100 : माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना डावलून ‘सुपर-100’! 6 सदस्यांची समिती राबविणार योजना

ZP Super-100 : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘सुपर- ५०’ च्या धर्तीवर यंदाही ‘सुपर-१००’ ही नावीन्यपूर्ण योजना राबविली जात आहे.

माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या या योजनेत त्या विभागाचे शिक्षणाधिकारी यांना बाजूला ठेवण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना डावलून सहा सदस्यांची समिती नियुक्त केली आहे.

या समिती सचिवांनी योजनेची अंमलबजवाणी करावी, असे निर्देश मित्तल यांनी दिले आहेत. गतवर्षी ही योजना राबवितांना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नकारघंटा वाजविली होती.

त्यामुळे विभागाची योजना असतानाच शिक्षणाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचे बोलले जात आहे. (ZP Super100 by leaving secondary education officers committee of 6 members will implement plan nashik news)

जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील निवडक ५० विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकीचे धडे गिरविण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेकडून ‘सुपर- ५०’ ही योजना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी हाती घेतली.

त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री दादा भुसे यांनी एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. या योजनेचे लोकप्रतिनिधींकडून कौतुक झाले. त्यामुळे नावीन्यपूर्ण असलेली ही योजना यंदाही राबविण्याचे निर्देश पालकमंत्री भुसे यांनी दिले.

त्यानुसार जिल्हा परिषदेकडून यंदाच्या आर्थिक वर्षातही ‘सुपर- १००’ योजना राबविली जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून तयारी सुरू आहे. संबंधित योजना माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत असल्याकारणाने विभागाकडून गतवर्षी राबविली गेली.

यंदाही याच विभागाकडून राबविली जाणार असून, त्यादृष्टीने बैठकादेखील झाल्या. मात्र, यंदा ही योजना राबविताना विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना बाजूला ठेवण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना डावलून योजनेसाठी सहा सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संबंधित समितीने योजना राबविण्याबाबत कार्यवाही करावी. सदस्य सचिव यांनी या योजनेची फाइल, आदिवासी उपयोजना विशेष घटक योजनेतून प्रस्ताव, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निधीची उपलब्धता, इतर विभागांशी समन्वय आदी अनुषांगिक बाबींचे कामकाज पाहतील.

इतर सदस्य त्यांना सहाय्य करतील. या विद्यार्थ्याची निवड चाचणी पात्रता परीक्षा जून २०२३ अखेरीस होत असून, जुलै २०२३ मध्ये नियमित वर्ग सुरू होतील, असे नियोजन ही समिती करेल, असे मित्तल यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे समितीत माध्यमिक शिक्षण विभागातील इतर अधिकारी, कर्मचारी यांना स्थान देण्यात आले आहे.

नियुक्त करण्यात आलेली समिती

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (समिती अध्यक्ष), जिल्हा समाज कल्याण अधिकारी (सदस्य सचिव), प्राथमिक शिक्षणाधिकारी, मनीषा पिंगळकर (विस्तार अधिकारी, माध्यमिक विभाग), सुधीर पगार (अधीक्षक वर्ग-२, माध्यमिक विभाग), धनराज भोई, (वरिष्ठ सहा. माध्यमिक शिक्षण विभाग) सर्व समिती सदस्य.

टॅग्स :NashikZP