Vidhan Sabha 2019 : भाजप-सेना सरकारने शेती व्यवसाय देशोधडीला लावला : डॉ. कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 October 2019

बागलाण विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस, पक्षासह महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार दीपिका चव्हाण यांच्या प्रचारार्थ नामपूर (ता.बागलाण) येथील ऐतिहासिक झेंडा चौकात आयोजित प्रचार सभेत खासदार डॉ. कोल्हे बोलत होते.

सटाणा : शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या पाच वर्षात सत्ताधारी भाजपा सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा असलेला शेती व्यवसाय देशोधडीला लावला. राज्यात उद्योग, रोजगार निर्माण करून शेतकऱ्यांच्या मालाला समाधानकारक भाव मिळवून देईन, अशी आश्वासने भाजपा सरकारने दिली होती. गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी  कारभार कसा केला आहे, हे सर्वश्रुत आहे. सत्ताधारी शासन सर्व आघाड्यावर अपयशी ठरले असून, या निष्क्रिय सरकारला घरी बसवा,' असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी येथे केले.

बागलाण विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस, पक्षासह महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार दीपिका चव्हाण यांच्या प्रचारार्थ नामपूर (ता.बागलाण) येथील ऐतिहासिक झेंडा चौकात आयोजित प्रचार सभेत खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार,  जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती  यतींद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, तालुकाध्यक्ष ऍड रेखा शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती  अशोक सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ कोल्हे म्हणाले, की, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाचे कोसळलेले भाव, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दुष्काळी परिस्थिती असे महत्वाचे प्रश्न असताना ३७० सारख्या कलमाच्या निर्णयाचे भांडवल करून भाजपा सरकार जनतेची दिशाभूल करत आहे.  'महाराष्ट्रच दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बागलाणच्या भूमीतील साल्हेर येथील ऐतिहासिक किल्ला सरकारने विकायला काढला, ही अतिशय खेदजनक बाब आहे. साल्हेर येथील लढाईत शिवरायांचे बालसवंगडी सूर्याजी काकडे यांच्या बलिदानाचा सरकारला विसर पडला आहे. राज्यात तत्त्वता कर्जमाफी योजनेचा किती शेतकऱ्यांना लाभ झाला, हा संशोधनाचा विषय आहे. शेतकऱ्यांसह  सर्वसामान्य माणसाला त्रास देणारी मानसिकता राज्यला घातक आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सोन्याचे दिन आणणाऱ्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी भरघोस मतांचे दान महाआघाडीच्या पारड्यात टाकावे, असेही ते म्हणाले. विद्यमान आमदार दीपिका चव्हाण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी उमदे नेतृत्व आहे. 

त्यामुळे तालुक्याच्या उज्वल भवितव्यासाठी विरोधकांच्या  भूलथापांना बळी न पडता विकासाची जाण असणाऱ्या दीपिका चव्हाण यांना विजयी करा, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Amol Kolhe targets BJP Shivsena government in Maharashtra