Compost Fertilizer : ...तर महापालिकेत 12 कोटींची बचत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule municipal corporation news

Compost Fertilizer : ...तर महापालिकेत 12 कोटींची बचत!

धुळे : घराघरांतून निघणारा कचरा रोज घराबाहेर जावा, अशी कुटुंबातील प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यातही घरातल्या महिलांना या कचऱ्याची सर्वाधिक चिंता असते.

त्यामुळे कचऱ्याची (Garbage) विल्हेवाट लागणे महिलांसाठी अधिक सोयीचे असते. (Need to motivate women for household composting by municipal corporation will save about 12 crore dhule news)

घरातला कचरा बाहेर काढून घर स्वच्छ-सुंदर ठेवण्यात महिलांचा सिंहाचा वाटा असतो. अशीच भूमिका या महिलांनी वठवायची ठरविली तर संपूर्ण शहर त्या कचरामुक्त करू शकतात. महापालिकेत सध्या ‘महिलाराज’ आहे.

त्यांनी पुढाकार घेतला तर घराघरांतून निघणाऱ्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लागू शकते. यातून महापालिकेचे तब्बल १२ कोटी रुपये वाचणार आहेत. हे आव्हान ‘महिलाराज’ कसे पेलते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

स्वच्छ भारत, स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावून शहर कचरामुक्त व सुंदर बनविण्याचा उद्देश आहे. इतर अनेक शहरांप्रमाणे धुळ्यातही हा उद्देश मात्र काही केल्या साध्य होताना दिसत नाही.

कचरा संकलन, जनजागृती यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले तरी कचऱ्याची समस्या अद्यापही भाषणांमध्येच अडकलेली आहे. प्रत्यक्ष स्वच्छ-सुंदर शहराचे स्वप्न अद्यापही दूर आहे. ते साकारण्यासाठी घराघरांतून निघणाऱ्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लागणे गरजेचे आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

घरोघरी कंपोस्टिंग व्हावे

ओला-सुका कचरा वर्गीकरण यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र कचऱ्याचे वर्गीकरण न होणे हीच मोठी समस्या आहे. आजही असे वर्गीकरण होताना दिसत नाही. त्यामुळे या समस्येवर काम होणे महत्त्वाचे आहे. शिवाय कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यानंतर ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती करणे अत्यंत गरजेचे आहे.

महापालिकास्तरावर या प्रक्रियेलाही अद्याप म्हणावा तसा वेग मिळालेला नाही. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये घराघरांतून निघणाऱ्या ओल्या कचऱ्याचे घरस्तरावरच कंपोस्टिंग व्हावे, अशी शासनाची सूचना आहे. या प्रयोगावरही मोठे काम होण्याची गरज आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर कचऱ्याची मोठी समस्या मार्गी लागून शहर स्वच्छ-सुंदर होण्यास मदत होणार आहे.

महिलाराजने पुढाकार घ्यावा

महापालिकेत सध्या महापौर, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, उपसभापती अशा चारही प्रमुख पदांवर महिला विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे एका अर्थाने धुळे महापालिकेत महिलाराज अवतरले आहे.

शिक्षण, स्वकर्तृत्वाने त्यांनी ही पदे मिळविली आहेत. या महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला तर धुळे शहर स्वच्छ-सुंदर करण्याचे स्वप्नही साकार होऊ शकेल. यासाठी घराघरांतून निघणाऱ्या ओल्या कचऱ्यावर घरस्तरावरच कंपोस्टिंग करण्यासाठी मनपातील महिला पदाधिकाऱ्यांनी शहरातील महिलांकडे आग्रह धरण्याची गरज आहे.

विविध छोट्या-मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्या महिलांमध्ये हा विचार त्यांनी रुजवावा, अशी अपेक्षा आहे. असे झाले तर शहरात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

बारा कोटींची बचत

ओल्या कचऱ्यावर कंपोस्टिंगसाठी महापालिकेची मोठी यंत्रणा राबते. अगदी कचरा संकलनापासून ते वर्गीकरण व प्रत्यक्ष कंपोस्ट खतनिर्मिती यासाठी मोठी प्रक्रिया होते. त्यासाठी अवाढव्य खर्चही लागतो. कंपोस्ट खतनिर्मितीसाठी महापालिकेला दर वर्षी १२ कोटी रुपये खर्च लागणार आहे.

घरस्तरावर कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाला तर महापालिकेचे वर्षाला तब्बल १२ कोटी रुपये वाचणार आहेत. त्यामुळे महापौर प्रतिभा चौधरी, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका अग्रवाल, उपसभापती विमलबाई पाटील यांनी घरोघरी कंपोस्ट खतनिर्मितीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे.