इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षकाने लढवली शक्कल

A new way to teach English
A new way to teach English

धुळे : शाळेच्या आवारात मुलांसह पक्ष्यांचाही किलबिलाट ऐकू यावा, पर्यावरणाची जोपासना व्हावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी शिक्षणाची ओढ लागावी, या तळमळीतून हेंद्रुण (ता. धुळे) येथील सर्वोदय विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षकाकडून पक्ष्यांच्या सहवासात विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या उपक्रमाला शालेय कर्मचाऱ्यांनीही प्रतिसाद दिल्याने तो यशस्वी ठरत आहे.

धुळे येथील रहिवासी तथा हेंद्रुणच्या सर्वोदय विद्यालयाचे शिक्षक अविनाश खैरनार यांनी आपल्या परसबागेत झाडांची लागवड केली. वाढते प्रदूषण, वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचा आवाज कानावर पडत नसल्याची खंत त्यांना होती. त्यामुळे त्यांनी जुने पुठ्ठे, सुताराकडील वाया गेलेले प्लायवूड, घरगुती टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी घरटी बनवली. परसबागेतील झाडांवर ती टांगली. या घरट्यांमध्ये रोज जेवणानंतर उरलेले अन्न टाकू लागले. ते खाण्यासाठी खारीसह कावळे, चिमण्या, पोपटसारखे पक्षी जमू लागले. काही पक्ष्यांनी पुठ्ठ्यांच्या घरांमध्येच घरटी बनवून वास्तव्यास सुरवात केली. हाच उपक्रम शाळेतही राबवून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीद्वारे समजावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

स्वतः काही घरे तयार करत ती शाळेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव मासरे यांच्या 24 व्या स्मृतिदिनी म्हणजे गेल्या सहा डिसेंबरला ही घरे शाळेला अर्पण केली. ती शाळेच्या आवारातील झाडांवर टांगून माध्यान्ह भोजनातील उरलेले अन्न टाकू लागले. शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घ्यावा, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्यावर मुख्याध्यापकांनी परवानगी दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आवडीने स्वतः घरे तयार करून आणली. आपल्या सवडीनुसार शाळा भरण्याच्या अगोदर व मधल्या सुटीत अन्नपदार्थ ठेवू लागले. त्यामुळे परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे.

इंग्रजी सुधारण्यासाठी प्रयत्न

विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयात प्रगतीसाठी श्री. खैरनार यांनी विविध उपक्रम राबविले. त्यांनी तयार केलेल्या फलकावर दहावीची 55 गुणांची प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतली. शाळेच्या आवारात त्यांनी इंग्रजीत विविध सूचनाफलक लावले. येता-जाता विद्यार्थी वाचत असल्याने त्यांचे इंग्रजी सुधारते आहे. श्री. खैरनार पक्ष्यांच्या माहितीच्या आधारे इंग्रजीत कथालेखन, कथाकथन, ट्री डायग्राम, माहितीची देवाण-घेवाण आदी घटकांनुसार अभ्यास करून घेतात. आवारात येणाऱ्या पक्ष्यांची नावे विद्यार्थी इंग्रजीतून शोधतात. काही विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेच्या धर्तीवर पक्षी व पर्यावरणावर आधारित प्रश्‍नपत्रिकाही तयार केली.

उपक्रमाच्या माहितीसाठी यू ट्यूब चॅनल

विद्यार्थ्यांचा प्रत्येक गट आपल्याच घरट्यांकडे जास्तीत जास्त पक्षी आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. श्री. खैरनार यांनी या उपक्रमाची माहिती देण्यासाठी यू ट्यूब चॅनल तयार केले. यातून प्रेरणा घेऊन अन्य शाळांनीही असा उपक्रम राबवावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. यासाठी त्यांना मुख्याध्यापक एम. एफ. माळी, पर्यवेक्षक एस. पी. थोरात यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही साथ लाभत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com