Child Marriage: नंदुरबार, तळोदा तालुक्यात बालविवाह विरोधी शपथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child Marriage

Child Marriage: नंदुरबार, तळोदा तालुक्यात बालविवाह विरोधी शपथ

नंदुरबार : बालविवाहामुळे मुलींचा आरोग्यावर होणारे परिणाम व त्यातून जिल्ह्यात वाढलेले कुपोषणाला आळा घालण्यासाठी जिल्हापोलिस दलातर्फे ग्रामीण भागात ऑपरेशन अक्षता अभियानाला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यांत नंदुरबार व तळोदा तालुक्यातील काही गावांमध्ये बैठका घेऊन ग्रामस्थांना बालविवाह विरोधी शपथ देण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तळोदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल यांनी तळोदा तालुक्यापासून सुरु होणाऱ्या या पथदर्शी कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन कामकाजाची सुरवात केली. उपक्रमाच्या सुरवातीनंतर पहिल्या पंधरवड्यातच त्यांनी तळोदा तालुक्यातील बुधावल, सोमावल खु., नळगव्हाण, लोभाणी, तळवे, मोहिदा येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांची बैठक घेतली. त्यांना ग्रामसभेत बाल विवाहविरोधी शपथ दिली.

तसेच, नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तालुका पोलिस ठाणे हद्दीतील कोपर्ली, इंद्री हट्टी, चौपाळे, शनिमांडळ, घोटाणे, आसाने, रनाळे, भादवड, आक्राळे येथे आयोजित ग्रामसभेत बाल विवाहविरोधी शपथ दिली.

ग्रामसभेत नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी बालविवाह रोखणे, बालविवाह केल्याने महिलांना होणारा त्रास, बालविवाह केल्यास होणारी कायदेशीर कारवाई व शिक्षेबाबत तसेच महिलांच्या शरीरावर होणारे त्याचे दुष्परिणाम यांची माहिती दिली.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

ग्रामपंचायतींमध्ये ठराव तसेच बाल विवाहविरोधी शपथ कार्यक्रम घेऊन नंदुरबार तालुक्यातील सर्व शाळा/महाविद्यालयात बाल विवाहविरोधी शपथ घेण्याचा मानस पोलिस निरीक्षक श्री. पवार यांनी व्यक्त केला आहे.