असोदा रोडच्या खड्ड्यांनी घेतला आणखी बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

जळगाव - असोदा रेल्वेगेटजवळ काल रात्री दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त दुचाकीस्वार त्याच्या मित्राला रेल्वेस्थानकावर सोडून घराकडे परतत असताना हा अपघात झाला.

जळगाव - असोदा रेल्वेगेटजवळ काल रात्री दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त दुचाकीस्वार त्याच्या मित्राला रेल्वेस्थानकावर सोडून घराकडे परतत असताना हा अपघात झाला.

शनिपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. असोदा रोडवरील खड्डे आणि रस्त्यांवरील बंद पथदिवे यामुळे अपघात नित्याचे झाले असून, या खड्ड्यांनी आणखी एक बळी घेतल्याने असोदेकर व या मार्गावरील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
असोद्यातील रहिवासी तथा रेमंड वस्त्रोद्योग कंपनीत कंत्राटी कामगार, रितेश विलास भोळे (वय 24) शनिवारी रात्री जळगाव रेल्वेस्थानकावर आला होता. रितेशचा मित्र नाशिकला जाण्यासाठी निघाल्याने तो त्याला असोदा येथून जळगाव रेल्वेस्थानकावर सोडून घराकडे परतताना रेल्वेगेटजवळ खराब रस्त्यामुळे त्याची दुचाकी घसरली. रात्री साडेअकराला घडलेल्या या अपघातात त्याच्या डोक्‍याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांना अपघात झाल्याचे लक्षात येताच जखमी तरुणाला गणपती हॉस्पिटलमध्ये नेले. यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविले. डॉ. मिलिंद बाविस्कर यांनी रितेशची तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. याबाबत मिलिंद बाविस्कर यांनी दिलेल्या खबरीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

असोदेकर छेडणार आंदोलन
मृत रितेश गेल्या एक वर्षापासून रेमंड कंपनीत कंत्राटी पद्धतीवर कामगार होता. त्याच्यामागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. होतकरू व मनमिळावू स्वभाव असल्याने त्याचा मित्रपरिवारही बऱ्यापैकी होता. असोदा-जळगाव ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचे अपघात नित्याचे झाले आहेत. रात्रीचा अंधार आणि रस्त्याची दुर्दशा यामुळे यापूर्वीही अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर काहींना अपंगत्व आले. यापूर्वी असोदा रेल्वेगेटजवळ झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत नेहते व चिरमाडे यांचा मृत्यू झाला. कालच्या घटनेत रितेशचा त्याच ठिकाणी रस्ता खराब असल्याने मृत्यू झाला. तेव्हाही नागरिकांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती, आता असोदावासी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one killed in accident