मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. ई. वायुनंदन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे चौदावे कुलगुरू म्हणून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे स्कूल ऑफ सोशल सायन्सचे संचालक डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी डॉ. वायुनंदन दोन दिवसांमध्ये नाशिकमध्ये येत आहेत.

नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे चौदावे कुलगुरू म्हणून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे स्कूल ऑफ सोशल सायन्सचे संचालक डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी डॉ. वायुनंदन दोन दिवसांमध्ये नाशिकमध्ये येत आहेत.

डॉ. माणिकराव साळुंखे यांनी कुलगुरुपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे प्रभारी कुलगुरुपदाची सूत्रे सोपविण्यात आली होती. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती मोहित शाह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती स्थापन केली होती. समितीतर्फे निवड प्रक्रिया पूर्ण करून डॉ. वायुनंदन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

डॉ. वायुनंदन हे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात ऑगस्ट 1987 पासून कार्यरत आहेत. त्यांनी लोकप्रशासनमधील एम.ए. सह एम.फील., पीएच.डी. पदव्युत्तर पदवी संपादन केल्या आहेत. लोकप्रशासनातील नवनवीन अभ्यासक्रम निर्मितीत त्यांचा सहभाग राहिला आहे. नागरी प्रशासनातील पदव्युत्तर पदवीनिर्मितीत सहभाग देण्यासह प्रशासनपद्धती, कामगार प्रशासन, सार्वजनिक धोरण हे त्यांच्या संशोधनाचे विषय राहिले आहेत. पाच पुस्तकांचे संपादन- लेखन त्यांनी केले आहे.

मुक्त शिक्षणातील अनुभवाचा पुरेपूर वापर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्यानंतर भ्रमणदूरध्वनीवरून डॉ. वायुनंदन यांच्याशी संवाद साधण्यात आला. "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, की मुक्त शिक्षण प्रणालीतील तीस वर्षांच्या अनुभवाचा पुरेपूर वापर कुलगुरू म्हणून केला जाईल. सामाजिक शिक्षणाबद्दल असलेली बांधिलकी पुढे नेली जाईल. नाशिकच्या मुक्त विद्यापीठाने अभ्यासक्रमामध्ये विविधता जपली असताना समाजातील विविध घटकांपर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोचवण्यात आली आहे. हाच धागा अधिक बळकट केला जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: open university vice chancellor dr. e. vayunandan