
पांझरा कान कारखान्यातून पुढील वर्षी गाळप शक्य : उद्योजक पवन मोरे
साक्री (जि. धुळे) : बंद असलेला पांझरा कान सहकारी साखर कारखाना नाशिक येथील स्पर्श शुगर इंडस्ट्रीजने पुढील २५ वर्षांसाठी भाडेकराराने चालविण्यास घेतला असून, शक्य झाल्यास पुढील वर्षापासूनच गाळप हंगामास सुरवात होणार असल्याची माहिती उद्योजक पवन मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक येथील स्पर्श शुगर इंडस्ट्रीजने पांझरा कान कारखाना २५ वर्षासाठी भाडेकराराने घेतल्यानंतर या संदर्भात मंगळवारी (ता.२१) उद्योजक पवन मोरे यांनी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पवन मोरे म्हणाले, बँकेशी भाडे करार झाल्यानंतर दस्त नोंदणीची प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून, शिखर बँकेचे प्राधिकृत अधिकारी संजय शिंदे यांनी आपल्याकडे कारखान्याचा ताबा दिला आहे. सुरवातीला दोन वर्षे ५२ लाख रुपये वार्षिक भाडे राहणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षांसाठी एक कोटी तर त्यापुढे दोन कोटी रुपये वार्षिक भाडे असणार आहे.
हेही वाचा: पावसाळ्यातही 53 गावे-वस्त्यांची टँकर भागवताय तहान!
या ठिकाणी असणारी पूर्वीची मशिनरी ही फारशी उपयोगात येणार नसल्याने संपूर्णपणे नवीन मशिनरी आणून कारखाना सुरू करणार आहोत. यातून शक्य झाल्यास पुढील वर्षीच ऊस गाळपास सुरवात करण्याचा प्रयत्न राहणार आहेत. तसेच या ठिकाणी असणाऱ्या संपूर्ण २८७ एकर जागेचा ताबा मिळाला आहे. या जागेवर शिखर बँकेने शेतीपूरक अन्य व्यवसाय करण्यास देखील परवानगी दिली आहे. यामुळे या ठिकाणी आणखी अन्य शेतीपूरक उद्योग सुरू करून अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती यावेळी उद्योजक पवन मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत धनंजय अहिरराव, पंचायत समिती उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे, मनसेचे संघटक धीरज देसले आदी उपस्थित होते.
हेही वाचा: धुळे जिल्ह्यात 324 कोटी पीककर्ज वितरित
Web Title: Panzara Kan Sugar Factory Production Starts From Next Year
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..