पटेलांसाठी सोपा ‘विजय’ थोडा कठीणच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

जळगाव - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जळगाव विधान परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी माघार घेतल्यानंतर भाजपचे चंदू पटेल यांचा विजय बिनविरोध होणार हे निश्‍चित होते. मात्र, अपक्ष उमेदवार विजय भास्कर पाटील उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम असल्याचे दिसताच पटेलांच्या बिनविरोधचे प्रयत्न थांबले. आता पाटील यांच्यासह सात उमेदवारांविरुद्ध त्यांना लढत द्यावी लागत आहे. भाजपचा विजय वरवर सोपा वाटत असला, तरी थोडा कठीणच जाणार आहे.

अपक्षांच्या उमेदवारीने भाजप उमेदवार पटेल यांना मते मिळविण्यासाठी प्रत्यक्ष भेटी घ्याव्या लागणार आहेत. त्या त्यांनी सुरूही केल्या आहेत. पटेल हे राजकारणात नवीन आहेत, त्यांना कोणताही अनुभव नाही. मात्र त्यांच्या पाठीशी असलेले 

नेते जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि यंत्रणाही या निवडणुकीतील अनुभवी असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. गुरुमुख जगवानी यांचा याच मतदारसंघात दोन वेळा विजय झाला आहे. त्यात हीच यंत्रणा काम करीत होती. आताही तीच यंत्रणा काम करीत आहे. याशिवाय प्रथमच खानदेश विकास आघाडीची यंत्रणाही भाजप उमेदवारासोबत असेल. आघाडीचे नेते व यंत्रणेलाही या निवडणुकीचा चांगला अनुभव आहे. 

व्यूहरचना तीन महिन्यांपूर्वीच 
निवडणूक बिनविरोध झालेली नाही, त्यामुळे पटेलांची यंत्रणा कामाला लागणार असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी याची तयारी अगोदरच केलेली आहे. विशेष म्हणजे पटेलांच्या मागे असलेल्या यंत्रणेनेही गेल्या तीन महिन्यांपासून  कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक मतदाराला भेटण्यापेक्षा गटनिहाय संपर्क करण्यात आला आहे. त्या-त्या पालिकेतील पक्षाच्या किंवा आघाडीच्या गटनेत्यावर जबाबदारी असणार आहे; तर जिल्हा परिषदेत पक्षाच्या गटनेत्यावर ही जबाबदारी असल्याचे सांगण्यात येत आहे. समोर अपक्ष उमेदवार असल्याने पटेलांचा विजय निश्‍चित मानला जात असला तरी ते गाफील नाहीत. अनुभवी यंत्रणेच्या आधारावर ते आपले मत भक्कम करून विजय पदरात पाडतील असे सांगण्यात येत आहे.

श्री. पटेल यांनी जिल्ह्यातील मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून, रविवारी त्यांनी चोपडा येथे जाऊन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, धरणगाव येथे ज्ञानेश्‍वर महाजन आदी नेत्यांच्या भेटी घेतल्याचे सांगण्यात आले.
 
दोन लाकूड व्यावसायिकांत लढत
विधानपरिषदेत प्रथमच दोन समव्यावसायिकांची लढत आहे. भाजप उमेदवार चंदू पटेल यांचा मूळ व्यवसाय लाकडाचा आहे. त्यांची शिवाजीनगरातील लाकूडपेठेत वडिलोपार्जित जलाराम सॉ मिल ही फर्म आहे; तर अपक्ष उमेदवार ॲड. विजय भास्कर पाटील यांचाही व्यवसाय लाकडाचा असून, नेरीनाका रस्त्यावर त्यांची वडिलोपार्जित सूर्या सॉ मिल ही फर्म आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patel bit difficult to easy victory