Latest Marathi News | शिंदखेड्यातील परेशने दाखविला माणुसकी धर्म; 70 वर्षांच्या आजीला केली मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Old People

Dhule News : शिंदखेड्यातील परेशने दाखविला माणुसकी धर्म; 70 वर्षांच्या आजीला केली मदत

शिंदखेडा (जि. धुळे) : भांडणातून लेकीच्या घरून निघून गेलेली ७० वर्षांची आजी रात्री शिंदखेडा बसस्थानकात उदास चेहऱ्याने भुकेल्या अवस्थेत बसली होती. गावाला जायला गाडी नाही. काय करावे माहिती नाही. जवळ नवा पैसा नाही. कधी कुणाला काही मागितलेले नाही. त्यामुळे कुणाला काही मागायची हिंमत होत नाही... डोळे अश्रूंनी डबडबले... अशा अवस्थेत एका तरुणाचे तिच्याकडे लक्ष जाते.

तरुण तिची विचारपूस करतो, तिची अवस्था बघून निराश होतो आणि चक्क तिला घरी चालण्याचा आग्रह करतो. आजी नकार देते. लगेच हा तरुण घरी जावूऊन तिच्यासाठी जेवण, पाणी, पांघरुणासह पाचशे रुपये आजीला देतो! (Philanthropy shown by Paresh of Shindkheda Helped 70 year old grandmother Dhule Latest Marathi News)

येथील परेश नवनीतलाल शह यांचा हा मानवता धर्म. त्यांच्या आदर्शाचे गावात कौतुक होत आहे. परेश शहा आपल्या पत्नी आणि आईसोबत नगरपंचायतीच्या मागे राहतात. गरजूंना न सांगता मदत करणे हा त्यांचा छंदच. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात त्यांनी ड्यूटीवर असलेल्या पोलिसांसह ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने चहा-नाश्त्याचे वाटप सतत महिनाभर केले होते.

दोन दिवसांपूर्वी येथून जवळ असलेल्या एका खेडेगावात आपल्या लेकीकडे एक ७० वर्षांची आजी आलेली होती. काही कारणाने तिचे मुलीशी भांडण झाले. त्या भांडणातून तिने बस्थानक गाठले. वेळ सायंकाळची. अंधार झालेला. आजी अश्रू गाळत स्थानकात बसलेली. त्याच वेळी समोरच्या चहाच्या हॉटेलमध्ये परेश आपल्या मित्रांसोबत बसलेले होते. त्यांचे लक्ष आजीकडे जाताच त्यांनी आजीची भेट घेतली.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: ST Free Ride Scheme : 2 कोटीहून अधिक ज्येष्ठांनी घेतला ST बसच्या मोफत प्रवासाचा लाभ

आजीने सर्व आपबीती सांगितली. आजीच्या गावाला जायला बस नव्हती‌. बोलण्यावरून आजीच्या पोटातही काही नसल्याचे जाणवले. जवळ पैसे नव्हते. अशा स्थितीत ती रात्रभर काय करेल, कोठे आणि कशी जाईल या विचाराने परेशला ग्रासले. त्याने आजीला घरी घेऊन जाण्याची भूमिका घेतली‌. मात्र आजीच्या स्वाभिमानाने नकार दिला.

परेशने नंतर आपल्या घरून आजीसाठी जेवण, पाणी आणून दिले. एवढेच नाही तर आजीसाठी झोपायला पांघरूण आणून दिले. आजीला तिच्या घरी जाण्यासाठी पाचशे रुपयेही दिले. परेशच्या या माणुसकीने आजीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. परेशचे परिसरात कौतुक होत आहे.

हेही वाचा: Nashik News : ‘जंगलू’ला निरोप देताना कळवणकर भावूक; गिरणाकाठी अंत्यसंस्कार

टॅग्स :DhuleReligion Of Humanity