"प्लाझ्मा थेरपी'साठी जळगाव रेडक्रॉसचा "ऍक्‍शन प्लॅन' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 एप्रिल 2020

प्रशासन आणि सामान्य रूग्णालयाकडून कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची माहिती मागविण्यात येत आहे. अत्यंत निकडीच्या वेळी इतर अन्य निकषांची पूर्तता होत असेल तर, अशा रुग्णांना समुपदेशन करून त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. 
- डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी 
चेअरमन, रेडक्रॉस रक्तपेढी 

जळगाव : कोरोना संक्रमित रुग्णावरील उपचारासाठी अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसली तरी "प्लाझ्मा थेरपी'द्वारे या रोगावर यशस्वी उपचार होऊ शकतात, असे संशोधन समोर आल्यानंतर त्यावर अधिक अभ्यास सुरु आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने या उपचाराला मान्यता दिल्यानंतर त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. "प्लाझ्मा थेरपी'चा प्रयोग राबविता यावा म्हणून जळगाव रेडक्रॉसने त्यादृष्टीने यंत्रणा उभारणीसाठी "ऍक्‍शन प्लॅन' सुरु केला आहे. 

राज्यभरात लौकिकप्राप्त असलेल्या जळगाव रेडक्रॉसने प्लाझ्मा थेरेपीसाठी पूर्वतयारी म्हणून सर्व सिद्धता करण्यासाठी नियोजित आराखडा तयार केला आहे. यासंदर्भात रेडक्रॉसचे पदाधिकारी राज्यातील तज्ज्ञांशी संपर्कात असून रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी, तांत्रिक कर्मचारी व अन्य सहाय्यक कर्मचाऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. यानुषंगाने रेडक्रॉंसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तसेच आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शन नुसार या थेरेपीचा वापर करण्यात येईल. त्यादृष्टीने रेडक्रॉसनेच उपाध्यक्ष गनी मेमन,सचिव विनोद बियाणी, सहसचिव राजेश यावलकर, अनिल कांकरिया व अन्य पदाधिकारी या थेरेपीच्या वापरासाठी कटिबद्ध झाले आहेत. 

काय आहे प्लाझ्मा थेरपी? 
या थेरपीमुळे तुमच्या शरीरात असणारे अँटीबॉ
डीज वाढवल्या जातात. यामुळे शरीरातील व्हायरसचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात व्हायरसचा शिरकाव होतो तेव्हा त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. ज्या या व्हायरसचा सामना करतात. प्लाझ्मा थेरपीमुळे या अँटीबॉडीजमध्ये वाढ होते आणि रूग्णाची रोग प्रतिकारक क्षमता वाढू शकते. या अँटीबॉडीज आपल्या रक्तात हा व्हायरस निघून गेल्यानंतरही अनेक दिवस राहतात. त्यामुळे हा व्हायरस रूग्णाच्या शरीरात पुन्हा प्रवेश करू शकत नाही. वैद्यकीय भाषेत या थेरपीला "प्लाझ्मा डिराइव्ड थेरपी' असे म्हटले जाते. यात दुसऱ्यांच्या शरीरातून अँटीबॉडीज काढून रूग्णाच्या शरीरात त्या इंजेक्‍ट केल्या जातात. ज्यामुळे रुग्ण कुठल्याही व्हायरसपासून स्वतःचा बचाव करू शकतो. या प्रक्रियेला "पॅसिव्ह इम्युनिटी' असं म्हणतात. 

प्रशासन आणि सामान्य रूग्णालयाकडून कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची माहिती मागविण्यात येत आहे. अत्यंत निकडीच्या वेळी इतर अन्य निकषांची पूर्तता होत असेल तर, अशा रुग्णांना समुपदेशन करून त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. 
- डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी 
चेअरमन, रेडक्रॉस रक्तपेढी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plasma therapy redcross jalgaon