esakal | चाळीसगावमध्ये राजकीय हालचालींना वेग
sakal

बोलून बातमी शोधा

sule.jpg

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नुकत्याच झालेल्या  चाळीसगाव दाैऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारल्याचे दिसत आहे.

चाळीसगावमध्ये राजकीय हालचालींना वेग

sakal_logo
By
आनन शिंपी

चाळीसगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्‍यात विविध राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान होत आहेत. सध्या भाजप लाटेमुळे पक्षातील कार्यकर्ते जोमात आहेत. परिणामी भाजपतर्फे इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारीबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारल्याचे दिसत आहे.

दरम्यान, शिवसेना व कॉंग्रेस तालुक्‍यात फारशी सक्रिय नसली तरी स्वतंत्र निवडणुका झाल्यास, त्यांनीही आपापला उमेदवार उभा करण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. वंचित आघाडीतर्फेही इच्छुक उमेदवारांच्या मतदारसंघात गाठीभेटी वाढल्या आहेत. एकूणच सध्याचे हे चित्र पाहता, या मतदारसंघाची होणारी निवडणूक जिल्ह्यात लक्षवेधी ठरणार आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तालुक्‍याचे आमदार उन्मेष पाटील यांचे नाव खासदारकीसाठी निश्‍चित झाल्यानंतर त्यांचा विजय होईल. मात्र, तो खूपच कमी फरकाने होईल असे भाजपचेच पदाधिकारी व कार्यकर्ते सांगत होते. मात्र, उन्मेष पाटलांना जे मताधिक्‍य मिळाले, ते पाहता अभ्यासू राजकीय विश्‍लेषकांनाही त्याचे आश्‍चर्य वाटले. अर्थात, मोदी लाटेचा हा परिणाम असल्याचा जो काही निष्कर्ष नंतर काढण्यात आला, त्यात तेवढेच तथ्यही आहे. आता ते आमदारचे खासदार झाल्यामुळे विधानसभेची उमेदवारी दुसऱ्याला मिळणार आहे. त्यादृष्टीने अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ही तयारी एकीकडे होत असताना दुसरीकडे पक्षांतर्गत मतभेदही वाढताना दिसत आहेत. भलेही त्याविषयी कोणी उघडउघड बोलत नसेल. मात्र, वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून त्याचा प्रत्यय दिसून येत आहे. जळगावला पक्षातर्फे इच्छुकांच्या झालेल्या मुलाखतीला अठरा जणांच्या इच्छुकांची यादी व तेथील फोटो व्हायरल झाल्यानंतर हा विषय सध्या चांगलाच चर्चिला जात असल्याने भाजपकडून तिकीट कोणाला मिळणार? याची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

राष्ट्रवादीमध्ये चैतन्य
तालुक्‍याचे माजी आमदार राजीव देशमुख हेच पुन्हा राष्ट्रवादीचे उमेदवार राहणार आहेत. पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या शहरात दोन दिवस थांबून होत्या. यानिमित्ताने संवाद यात्रेच्या कार्यक्रमात राजीव देशमुखांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर खासदार सुळे यांनी "आपल्या उमेदवाराची बॉडी लॅंग्वेज बोलते, की त्यांच्यात किती आत्मविश्‍वास आहे', असे सांगून त्यांनीही देशमुखांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे. राष्ट्रवादीत देशमुख घराण्याला मानणारा मोठा वर्ग आहे. खासदार सुळेंच्या दौऱ्यानंतर विशेषतः पक्षातील युवक व महिलांमध्ये त्यांनी जणू चैतन्य निर्माण केल्याचे दिसून आले. आजही राजीव देशमुखांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केल्यानंतर काही तासातच जी काही मोठ्या प्रमाणावर मदत गोळा झाली, त्यावरून त्यांच्या नेतृत्वाची चुणूक सहजच लक्षात येते.

कॉंग्रेस, शिवसेनाही तयारीत
राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना होण्यापूर्वी चाळीसगाव तालुक्‍यात कॉंग्रेसला पोषक वातावरण होते. किंबहुना कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदारही निवडून आले आहेत. पक्षातील ज्या काही जुन्या जाणत्यांची केवळ गांधी कुटुंबीयांवर म्हणा किंवा पक्षावर निष्ठा होती, असे काही जण आजही कॉंग्रेसमध्ये आहेत. हा मतदारसंघ सुरवातीपासूनच राष्ट्रवादीकडे असल्याने तालुक्‍यातील कॉंग्रेसमधील नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून प्रचार केला आहे. असे असले, तरी भविष्यात स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची वेळ आली तर कॉंग्रेसने तशी तयारी ठेवली आहे. जवळपास अशीच परिस्थिती शिवसेनेची आहे. शिवसेनेचे तालुक्‍यात फारसे वर्चस्व दिसत नाही. भाजपसोबत युती असल्याने शिवसेनेचे स्थानिक नेते व कार्यकर्ते निवडणूक काळात युतीधर्म पाळतात. मध्यंतरीच्या काळात शिवसेनेने भाजपच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती. मात्र, वरिष्ठांच्या निर्णयामुळे स्थानिक नेत्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला व भाजपशी जुळवून घ्यावे लागले होते. शिवसेना अजूनही पाहिजे तशी तालुक्‍यात वाढू शकली नाही, हे वास्तव आहे. मात्र, तरीही युती झाली नाही तर शिवसेनेतर्फे स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी केलेली आहे.

वंचित आघाडीतर्फे तयारी
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठिकठिकाणी मिळालेली मते निवडणुकीवर काय परिणाम करू शकतात, हे दिसून आले. "एमआयएम'सह इतरही लहान राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा उमेदवार राहणार हे निश्‍चित असून, सध्या दोघा तिघांनी जोरदार तयारी करून आपला जनसंपर्क वाढवण्यास सुरवात केली आहे. याशिवाय इतर काही जण अपक्ष म्हणून ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

loading image
go to top