esakal | भुसावळला ‘लॉकडाउन’वरून जुंपली 
sakal

बोलून बातमी शोधा

भुसावळला ‘लॉकडाउन’वरून जुंपली 

भुसावळ पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी नियोजन करणे, विक्रेत्यांना दुकान लावण्यासाठी व ग्राहकांना उभे राहण्यासाठी जागा आखून देणे, तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्‍यक आहे. असे असताना एकमेकांची उणी-दुणी काढणे कितपत योग्य आहे. 

भुसावळला ‘लॉकडाउन’वरून जुंपली 

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : शहरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढीस लागत आहे. आतापर्यंत दहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून, यापैकी दोघांचा बळी गेला आहे. शहराच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असून, यास वेळीच अटकाव करणे गरजेचे आहे. यादृष्टीने शहरात जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता, भाजपतर्फे संपूर्ण ‘लॉकडाउन’चे आवाहन केले होते. मात्र, माजी आमदार संतोष चौधरी यांनी यास विरोध केल्याने भुसावळचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, ही वेळ राजकारण करण्याची नसून, प्रशासनाला सहकार्य करीत, संघटित लढा देण्याची गरज आहे. 


शहरात दररोज ‘कोरोना’चे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. ज्या भागांत रुग्ण आढळून आले आहेत ते भाग प्रशासनाने ‘सील’ केले आहेत. कोरोनाचा फैलाव शहरातील इतर भागांत होऊ नये, यासाठी भाजपतर्फे तीन दिवसांचे संपूर्ण लॉकडाउन पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानंतर माजी आमदार संतोष चौधरी यांनी लागलीच पत्रकार परिषद घेऊन शासनाने दिलेले आदेशच आम्हाला मान्य आहेत. मात्र भाजप पदाधिकाऱ्यांना शहर बंद करण्याचा अधिकार नाही.

मदत करण्याची गरज

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दूध डेअरी, किराणा दुकाने व भाजीपाला विक्री सुरू राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी भाजीपाला लिलाव सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील होते. तर भुसावळ हायस्कूलच्या मैदानावर बाजार भरण्यावरून माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी व सचिन चौधरी दोघेही एकमेकांवर धावून येत त्यांच्यात जोरदार जुंपली होती. शहराला कोरोनाचा असलेला धोका लक्षात घेता सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन प्रशासन व भयग्रस्त जनतेला मदत करण्याची गरज आहे. 


नियोजनाचा पडला विसर 
‘लॉकडाउन’ काळात दूध, भाजीपाला, किराणा व मेडिकल सुरू ठेवण्यास प्रशासनाने मुभा दिली आहे. मात्र, भाजी बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राखले जात नाही. यादृष्टीने पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी नियोजन करणे, विक्रेत्यांना दुकान लावण्यासाठी व ग्राहकांना उभे राहण्यासाठी जागा आखून देणे, तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्‍यक आहे. असे असताना एकमेकांची उणी-दुणी काढणे कितपत योग्य आहे.