शेतांमध्ये उरले डाळिंबाचे सांगाडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

विहिरींनी तळ गाठला आहे. दुष्काळामुळे डाळिंब बाग वाचविणे अवघड झाले आहे. आजूबाजूचा गावांनी इतर गावात पाणी न देण्याचा ठराव केल्याने पाणी मिळणे मुश्‍किल झाले आहे. भाजीपाला गेला. आता द्राक्षाची मालकाडी तयार करणेही अवघड झाले आहे. उत्पादक पूर्णत: आर्थिक अडचणीत सापडला आहे. 
- अभिजित देवरे, डाळिंब उत्पादक, करंजाड (ता. बागलाण)

देवळा (जि. नाशिक) - पावसाचे वाहून जाणारे व अतिरिक्त पाणी वाचवून जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शेतात शेततळी तयार करीत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेततळी पाण्याने भरली न गेल्याने कोरडी ठाक आहेत. कागद खराब होऊ नये म्हणून उत्पादकाला तीन-चार हजार रुपये प्रतिटॅंकर विकतचे पाणी आणून या शेततळ्यांत टाकण्याची वेळ आली आहे. यामुळे ज्या शेततळ्याच्या भरवश्‍यावर दर वर्षी डाळिंबाचा मृगबहार धरला जायचा त्या बागांमध्ये सध्या डाळिंबाचे सांगाडे उभे आहेत.

येथील कसमादेसह चांदवड, नांदगाव, येवला भागात या वर्षी कमी पाऊस झाल्याने नदी-नाले भरून वाहिलेच नाहीत. यामुळे वाहून जाणारे पाणी अडवण्याचा प्रश्नच आला नाही. विहिरींना पाणी न उतरल्याने तसेही पाणी उपसून शेततळ्यात टाकता आले नाही. यामुळे शेततळी कोरडीच राहिली. शेततळ्यासाठी महागडा कागद वापरला जातो तो उन्हापासून खराब होऊ नये म्हणून विकतचे पाणी या शेततळ्यात टाकावे लागत आहे. ज्यांचे थोडेफार भरली होती त्यातील पाण्याचे उन्हाच्या तडाख्यात बाष्पीभवन होऊन ते आणखी कमी झाले आहेत. यात ज्या शेततळ्यांच्या भरवश्‍यावर दर वर्षी डाळिंबाचा मृग बहार धरला जात असे, त्या बागांत फक्त सांगडे उभे आहेत.

या बागा वाचावयाचा असतील, तर नित्याला प्रतिटॅंकर तीन हजार रुपये खर्च करून वाचवाव्या लागतील. तेही मिळेल की नाही, याची शाश्‍वती नाही, असे चित्र आहे. त्यातच शेततळ्याला लावला कागद कसा जत करायचा त्यासाठी पाणी कोठून आणायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. 

पाणी न जाऊ देण्याचा ठराव 
जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने ज्या गावात पाणी आहे त्यांनी इतर गावांत न देण्याचा किंवा टॅंकरद्वारे न देण्याचा ठराव करून देणाऱ्यांवर पाळत ठेवली आहे. असे ठराव बागलाणसह अन्य तालुक्‍यांत सुरू झाले आहेत. 

शेततळ्यांची तालुकानिहाय संख्या 
बागलाण - ९९८, चांदवड - १८३०, देवळा - २३९, दिंडोरी - ६३६, इगतपुरी - ३७, कळवण - १८६, मालेगाव - ५२६, नांदगाव - ३९९, नाशिक - ४१, निफाड - ४४३, पेठ - ३, सिन्नर - १४६१, सुरगाणा - ८९, त्र्यंबकेश्वर - १५ आणि येवला - २०६८

गेल्या दोन वर्षांपासून शेततळे कोरडे पडले आहे. यामुळे नाइलाजास्तव डाळिंबाची बाग उपटून फेकून द्यावी लागली.
- आबा सावकार, कनकापूर (ता. देवळा) 

शेततळ्यातील कागद खराब होऊ नये व डाळिंब पीक जगावे म्हणून विकतचे पाणी टॅंकरने आणून शेततळे भरण्याचा प्रयत्न चालवला आहे; पण अवघड आहे.
- उद्धव भामरे, खुंटेवाडी (ता. देवळा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate Agriculture Water Shortage Loss