शेतीसाठी नोकरी सोडली..आता बागेवर कु-हाडीचे घाव घालणे बाकी

दीपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

डाळिंब, द्राक्ष, कांदा, टोमॅटो व भाजीपाला शेतक-यांकडून जमा करून अहमदाबाद, सूरत, मुंबई, दिल्ली, नागपुर रवाना करीत होते. त्यातून मिळणा-या उत्पन्नातून वडीलोपार्जित शेतीची मशागत केली. सुरूवातीला डाळींबाची लागवड केली. डाळींब पिकातून भरघोस उत्पन्न मिळाल्याने त्यांनी तब्बल वीस एकर जमीन खरेदी केली. संपूर्ण क्षेत्रात डाळींब पिक उभे केले. शेतीत उत्पन्न वाढल्याने जाधव कुटुंबिय जोमाने शेतात कष्ट करीत होते. मात्र गारपीट, तेल्या व मररोगामुळे डाळींब शेती पुर्णतः उद्ध्वस्त झाली.

नाशिक : वरुणराजा आता बस झालयं...शेतीसाठी नोकरी सोडलीयं...आता बागेवर कु-हाडीचे घाव घालणे बाकी राहिलेत...काय करावं काहीच सुचत नाही...पावसामुळे होत्याचे नव्हते झाले, सोळा एकरातील द्राक्षे बागेतील एकही मनी हातात लागणारं नाही. नोकरी सोडली नसती तर परवडले असते. आता तेलही गेले अन् तुपही अशी म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. असे बोल आहेत..नोकरी सोडून शेतीत घाम गाळणा-या पोपट जाधव या तरूण शेतक-याचे परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिक वाया गेल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

परिस्थिती शांत बसू देत नव्हती...
बिजोटे (ता.बागलाण) येथील पोपट संतोष यांची वडिलोपार्जीत दहा एकर पडित कोरडवाहू जमीन होती. शेतीत कुळीदाला सुद्धा फुल लागत नाही अशी जमीन, जाधव यांनी घरची परिस्थिती बेताची असल्याने खडतर प्रवासात १९९६ मध्ये (B.A.BED)केले. त्यावेळी वर्षभर पोटाला पुरेल एवढे पुरेसे धान्यसुद्धा शेतातुन मिळत नव्हते, शिक्षण मोलमजुरी करुन पुर्ण केले, शिक्षण झाले परंतु नोकरीसाठी आर्थिक चणचण असल्याने ऐपत नव्हती. औरंगाबाद जिल्ह्यातील खडकेश्वर येथील शाळेत वर्षभर नोकरी केली. मात्र परिस्थिती शांत बसू देत नव्हती.१९९७ मध्ये नोकरी सोडली वाहनचालकाकडे पन्नास पैसे प्रती गोणपाट भरण्यासाठी कामाला लागले. त्यावेळी दिवसभरात शंभर ते दोनशे रूपये मिळत होते. याच पैशांवर कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते असे तीन वर्षे लोटले गेल्याचे पोपट जाधव यांनी सांगितले.

तेल्या व मररोगामुळे डाळींब शेती पुर्णतः उद्ध्वस्त

२००० सालात स्वतःच ट्रान्स्पोर्ट व्यवसाय सुरू केला. यात डाळिंब, द्राक्ष, कांदा, टोमॅटो व भाजीपाला शेतक-यांकडून जमा करून अहमदाबाद, सूरत, मुंबई, दिल्ली, नागपुर रवाना करीत होते. त्यातून मिळणा-या उत्पन्नातून वडीलोपार्जित शेतीची मशागत केली. सुरूवातीला डाळींबाची लागवड केली. डाळींब पिकातून भरघोस उत्पन्न मिळाल्याने त्यांनी तब्बल वीस एकर जमीन खरेदी केली. संपूर्ण क्षेत्रात डाळींब पिक उभे केले. शेतीत उत्पन्न वाढल्याने जाधव कुटुंबिय जोमाने शेतात कष्ट करीत होते. मात्र २०१३ मध्ये गारपीट, तेल्या व मररोगामुळे डाळींब शेती पुर्णतः उद्ध्वस्त झाली. पुन्हा उभारीसाठी बॅकेकडून सत्तर लाख रुपये कर्ज घेतले. संपूर्ण शेतीची मशागत करून सोळा एकर क्षेत्रात द्राक्षे लागवड केली. पहिल्या वर्षी वीस लाख रुपये बागेवर खर्च केला त्यात पंधरा लाखांचे उत्पन्न मिळाले. 

पिकातून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती...मात्र होत्याचे नव्हते झाले

२०१८ मध्ये तब्बल तीस लाख रुपये बागेवर खर्च केला. साठ लाखांचे घसघशीत उत्पन्न मिळाल्याने त्यात बॅकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते व व्याजाची रक्कम अदा केली. पुन्हा बॅकेकडून तीस लाख व नातेवाईकांकडून दहा लाख हातउसणवार केले. सर्व पैसा शेतीत ओतला सर्व खर्च झालेल्या पैशातून येणा-या पिकातून नव्वद लाख रूपये मिळण्याची अपेक्षा होती. मात्र होत्याचे नव्हते झाले अन् परतीच्या पावसाने स्वप्न धुळीत मिळाले. आदल्याच दिवशी व्यापरी द्राक्षे बाग पाहून एक्स्पोर्ट करण्याच्या तयारीत असतांनाच द्राक्षे बागेवर संकट कोसळले पावसामुळे संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली. एका रात्रीतच सोळा एकरातील द्राक्षे बागेवर एक मनीही हाती लागला नसल्याची कैफियत द्राक्षे उत्पादक शेतकरी पोपट जाधव यांनी मांडली. नोकरी सोडून पश्चात्ताप होतो असेही त्यांनी सांगितले मायबाप सरकारने द्राक्षे उत्पादकांना पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी मदत करावी अन्यथा द्राक्षे बागेवर कु-हाडीचे घाव घालण्याची वेळ येईल असे द्राक्षे उत्पादकांकडून बोलले जात  आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Popat Jadhav Leaving the teaching profession in the field of grapes agriculture