
Nandurbar News : तळोदा तालुक्यात आदिवासी संस्कृतीचे जतन! भजनी मंडळाकडून भजने गाऊन फागची मागणी
तळोदा (जि. नंदुरबार) : होलिकोत्सवादरम्यान तळोदा तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच ठिकठिकाणी रस्त्यांवर पारंपरिक पद्धतीने होळीचा फाग मागताना नागरिक दिसून येत आहेत. मात्र धनपूर (ता. तळोदा) येथील रामभक्त भजनी मंडळाकडून तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन अनेक भजने गाऊन ग्रामस्थांची दाद मिळवत त्यांच्याकडून फाग मागण्यात येत आहे.
त्यामुळे भजनी मंडळाकडून आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. (Preservation of tribal culture in Taloda Taluka Demand for Phag by singing bhajans from Bhajani Mandal Nandurbar News)
सातपुड्याच्या परिसरात होलिकोत्सव आठवडाभर साजरा करण्यात येत असतो. यादरम्यान होळी, धूलिवंदन, रंगपंचमी असे विविध सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात येतात. तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन, रेवानगर पुनर्वसन, जीवननगर पुनर्वसनसह परिसरातील विविध गावांमध्ये होलिकोत्सव उत्साहात पार पडला असून, परिसरात ढोल वाजंत्री, बाबा, बुध्या यांच्या स्पर्धाही घेण्यात आल्या आहेत.
आता परिसरात होलिकोत्सवादरम्यान गावात तसेच ठिकठिकाणी रस्त्यांवर होळीचा फाग मागताना नागरिक दिसून येत आहेत. होळीचा फाग मागताना नागरिकांकडून पारंपरिक पेहराव करण्यात येऊन बावा-बुध्यांकडून ठेका धरून लक्ष वेधण्यात येत आहे.
दरम्यान, तालुक्यातील धनपूर येथील रामभक्त भजनी मंडळाकडून तालुक्यातील विविध गावांत जाऊन तबलापेटी, ढोलकी यावर आदिवासी भजने, आदिवासी गीते, राम गवळण, एकतारी भजने गाऊन ग्रामस्थांची दाद मिळवत त्यांच्याकडून फाग मागण्यात येत आहे.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
त्यामुळे परिसरात त्यांच्याकडून आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या भजनी मंडळात फत्तेसिंग ठाकरे, जयराम पाडवी, रुता ब्राह्मणे, लीलाकर पाडवी, मोहन पाडवी, दिलीप पाडवी, महेंद्र वसावे, रतू पाडवी, दिनेश पवार आदी भजनी कलावंत आहेत.
एकंदरीत परिसरात अध्यापही ढोल, वाजंत्री, घुंगरू, बिरीच्या आवाजाने परिसर दुमदुमत असल्याचे चित्र असून, होळीचा फीव्हर आता तालुक्याच्या पश्चिमेकडे तसेच उत्तरेकडे जोर धरू लागला आहे.
स्वखुशीने देतात फाग
तळोदा तालुक्यातील विविध रस्त्यांवर भरउन्हातही रस्ता अडवून नागरिकांकडून पारंपरिक पद्धतीने होळीचा फाग मागण्यात येत आहे. वाहनधारकांकडूनही फाग देण्यात कुठलीही कसर करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे होलिकोत्सवाचा आनंद सर्व जण साजरा करीत असल्याचे दिसून येत आहे.