प्रा. डॉ. रिता माळचे-सोनवणे
प्रा. डॉ. रिता माळचे-सोनवणे

भिल्ल समाजातील रिता झाल्या 'डॉक्टरेट'

निजामपूर-जैताणे (धुळे) : शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे ही समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. असेच शून्यातून विश्व निर्माण केले आहे साक्रीतील भिल्ल वस्तीत राहणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीने. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या त्या चिमुरडीला काबाडकष्ट करून खंबीरपणे उभे केले ते तिच्या विधवा आई निंबाबाई शांताराम माळचे यांनी. सद्या मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. रिता माळचे-सोनवणे यांची ही यशोगाथा.

प्रा. डॉ. रिता माळचे-सोनवणे ह्यांनी नुकतीच मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पीएच.डी. मिळवून भिल्ल समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्या खान्देशातील भिल्ल समाजातून समाजशास्त्र विषयात पीएच.डी. मिळविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. बालपणीच वडील गेले. आई तरुण वयात विधवा झाली. त्यात तीन मुलींची जबाबदारी. त्यांचे पालनपोषण, शिक्षण, संगोपन, विवाह आदी जबाबदाऱ्या निंबाबाईंवर येऊन पडल्या. पूर्वापार हातभट्टीच्या व्यवसाय व मोलमजुरी करून त्यांनी आपल्या तिन्ही मुलींचे शिक्षण केले. तिघींपैकी मोठ्या दोन्हींचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांचा विवाह लावून दिला. त्यातील एक साक्रीला तर दुसरी दहीवेलला राहते.

सर्वात लहान रिता ही मात्र लहानपणापासूनच अतिशय जिद्दी व हुशार होती. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण साक्रीच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये, पदवीपर्यंतचे शिक्षण सी.गो.पाटील महाविद्यालयात, तर पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठात झाले. रिताने २००६ मध्ये समाजशास्त्र विषयातून विशेष प्राविण्यासह बी.ए. पूर्ण केले. पण पुढील शिक्षणासाठी आई बाहेरगावी पाठवायला तयार नव्हती. तत्कालीन उपप्राचार्य प्रा. डॉ. डी.एल. तोरवणे यांनी रिताला आपली मानसकन्याच मानले होते. त्यांनी तिच्या आईची समजूत काढली. मग रिताने थेट पुणे गाठले. तिथे गुणवत्तेनुसार एम.ए. ला प्रवेश मिळवला. तिथेच वसतिगृहात राहून व 'कमवा शिकवा' योजनेत काम करून तिने आपले शिक्षण देखील पूर्ण केले.

दरम्यानच्या काळात एम.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण झाल्यानंतर २००७ मध्ये ती 'सेट' परीक्षाही उत्तीर्ण झाली, तर २००८ मध्ये प्रथम श्रेणीत एम.ए. व 'नेट' परीक्षा देखील ती उत्तीर्ण झाली. पुणे विद्यापीठातील तत्कालीन समाजशास्त्र विभागप्रमुख कै. प्रा. डॉ. शर्मिला रेगे यांनी रिताला वेळोवेळी मदत केली. रिताने मुंबईच्या एसएनडीटी महाविद्यालयात वर्षभर अध्यापन केले. तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातही वर्षभर सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम केले. सन २००९ पासून त्या मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

शिक्षण घेत असताना एका बाजूला पीएच.डी. झाल्याशिवाय विवाह करायचा नाही असे त्यांनी ठरवले होते. तर दुसऱ्या बाजूला विवाहाबाबत त्यांच्यावर कौटुंबिक, सामाजिक दबाव वाढत होता. प्रा. एल.जी. सोनवणे व त्यांच्या बंधूंच्या मध्यस्थीने सन २०१० मध्ये नाशिक जिल्ह्यातील बापूसाहेब सोनवणे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. काही काळ पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर त्यांचे पती सद्या मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विवाहानंतर सन २०११ मध्ये प्रा. डॉ. रिता माळचे-सोनवणे यांनी पीएचडीसाठी नावनोंदणी केली. सन २०१७ मध्ये त्यांना पीएच.डी. जाहीर झाली. तर फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांना मुंबई विद्यापीठातर्फे कुलगुरूंच्या हस्ते पीएच.डी. प्रदान करण्यात आली. विद्यापीठातील निवृत्त समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. पी.जी. जोगदंड यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुमारे १५ शोधनिबंध सादर केले आहेत. भविष्यात खान्देशासह उत्तर महाराष्ट्रात उच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितच मुंबई सोडून गावाकडे येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपली आई निंबाबाई व आपल्या गुरुजनांना दिले आहे. सद्या प्रा. डॉ. रिता माळचे-सोनवणे ह्याच आपल्या आईचा सांभाळ करीत आहेत. आपल्या पीएच.डी.चा अर्थात संशोधनाचा ग्रामीण आदिवासी समाजासाठी उपयोग झाला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com