जिद्दीने केली संवेदनाहीन शरीरावर मात

दत्तात्रय ठोंबरे
मंगळवार, 15 जानेवारी 2019

नाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते; पण अशाही परिस्थितीत हार न मानता फक्त दहावी शिक्षण झालेले असताना पहिली ते पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतच्या मुलांचे क्‍लासेस घेऊन स्वतःच्या जीवनाला आकार दिला. याशिवाय इंग्लिश स्पीकिंग, तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठीही वर्ग घेऊन त्यांच्यासाठी मार्गदर्शनवर्ग चालवत आहेत. ही कहाणी आहे, पूर्णतः दिव्यांग असलेला आणि पलंगावर झोपून शिकवत यशस्वीरीत्या क्‍लासेस चालविणारा राहुल विंचूरकर यांची... 

नाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते; पण अशाही परिस्थितीत हार न मानता फक्त दहावी शिक्षण झालेले असताना पहिली ते पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतच्या मुलांचे क्‍लासेस घेऊन स्वतःच्या जीवनाला आकार दिला. याशिवाय इंग्लिश स्पीकिंग, तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठीही वर्ग घेऊन त्यांच्यासाठी मार्गदर्शनवर्ग चालवत आहेत. ही कहाणी आहे, पूर्णतः दिव्यांग असलेला आणि पलंगावर झोपून शिकवत यशस्वीरीत्या क्‍लासेस चालविणारा राहुल विंचूरकर यांची... 
इंदिरानगर येथील राहुल विंचूरकर यांचा जन्म १७ जून १९७४ चा.

दहावीपर्यंतचे त्यांचे आयुष्य सर्वसामान्य मुलासारखे होते. ऑटोमोबाईल इंजिनिअरचे स्वप्न उराशी बाळगलेले असताना दहावीनंतर इमारतीवरून पडल्यानंतर त्यांचे तीन मणके आणि मज्जारज्जू तुटला. शस्त्रक्रियेनंतर स्टीलचे रॉड टाकण्यात आले. बावीस दिवस रुग्णालयात काढले. घरी आल्यानंतर कोणतीच हालचाल करता येत नव्हती. त्या वेळी जगायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्‍न निर्माण झाला. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. उपचार करणारे डॉ. भरत केळकर यांनीही वैद्यकीय शुल्कही घेतले नव्हते; पण आहे त्या परिस्थितीत काहीही करून स्वाभिमानाने जगण्याच्या विचारातून त्यांनी १७ जून १९९२ पासून लहान मुलांना शिकवायला सुरवात केली. दिव्यांग असल्याने कुणी विश्‍वास ठेवेना. सुरवातीला पाच रुपये महिना घेऊन इंग्रजी माध्यमाच्या पहिलीच्या एका मुलीला शिकवायला सुरवात केली. हे शिकवणं म्हणजे पलंगावर झोपूनच. पुढे हळूहळू मुले वाढायला लागली; पण राहुल यांचे इंग्रजी आणि गणित कच्चे होते. मिळालेल्या पैशातून त्याने इंग्रजी आणि गणिताची पुस्तके विकत घेत सेल्फ स्टडी सुरू केला. वाचनाचाही छंद लागला. आज स्वतःचे पाचशे पुस्तकांचे ग्रंथालय आहे.

आत्मविश्‍वास वाढल्यानंतर दहावीच्या मुलांना शिकवायला सुरवात केली. दरम्यानच्या काळात इंग्रजी विषयीचा न्यूनगंड पूर्ण दूर केला. पुढे ‘मिरॅकल इंग्लिश स्पीकिंग’ नावाचा स्वतंत्र कोर्सच सुरू केला. अकरावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर वर्गांनाही शिकवणे सुरू केले. बिझनेस कम्युनिकेशन, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि अर्थशास्त्र हे विषयदेखील शिकवायला सुरवात केली. इंटरनेटवर अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची बेसिक तयारी कशी करावी, याविषयीही मार्गदर्शन केले. मात्र आता काम वाढत चालल्याने फक्त आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांवरच लक्ष केंद्रित केले. ज्या विद्यार्थ्यांना गणित अजिबात येत नाही, अशा विद्यार्थ्यांना माझ्याकडे शिकल्यानंतर पैकीच्या पैकी गुण पडले आहेत. विश्‍वास संपादन केल्यामुळे शहराच्या सर्वच भागांतून मुले येतात, असे ते आवर्जून सांगतात. 

असा आहे दिनक्रम 
पहाटे पाचला उठून सातपर्यंत सर्व तयार होऊन क्‍लासेसला सुरवात करतात. दुपारी फक्त एक तासाची जेवणाची सुटी घेऊन रात्री दहापर्यंत क्‍लासेस सुरू असतात. विद्यार्थी वाढल्याने सातवीपर्यंत शिकवण्यासाठी इतर शिक्षकांची नेमणूक केली. आठवीपासून पुढचे सर्व वर्ग स्वतः राहुल विंचूरकरच घेतात. आई, वडील, दोन भाऊ, वहिनी हे सर्वजण माझी पूर्ण देखभाल करतात, त्यांच्यामुळेच वाटचाल शक्‍य झाली, असेही आवर्जून सांगतात.

उद्योजक व्हायचे स्वप्न
रतन टाटा, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. विकास आमटे, विठ्ठल कामत, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड हे माझे आदर्श आहेत. डॉ. विकास आमटे घरी भेटायला आले होते. तसेच कामत व गायकवाड यांच्याशीही दूरध्वनीवर नियमित संपर्कात असतो. भविष्यात मोठे उद्योजक व्हायचं स्वप्न असल्याचे राहुल विंचूरकर सांगतात.

Web Title: Rahul Vinchurkar Handicapped Education Success Teaching Life Motivation