मुसळधारेत सहा तालुक्‍यांत प्रमाण ३० टक्‍क्‍यांपेक्षाही कमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

धरण क्षेत्रात पाऊस (मिलिमीटर) 
अंबोली    ८५
गौतमी    ३३
गंगापूर    ३० 
कश्‍यपी    २१ 
दारणा    १०
भावली    ६६

तालुक्‍यातील पाऊस
इगतपुरी    १७२
त्र्यंबकेश्‍वर    १२७
येवला    २२
दिंडोरी    १४
नाशिक    ११
पेठ    ६.५
निफाड    ५.५

नाशिक - पश्‍चिम पट्ट्यात पावसाची मुसळधार सुरू असली तरी जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांत अजून ३० टक्केही पाऊस झालेला नाही. एका बाजूला मुसळधारेने पश्‍चिम तालुक्‍यात दरड कोसळत असताना इतरत्र मात्र खरिपाला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. या परस्पर विसंगत स्थितीचे दर्शन घडते आहे.

जिल्ह्यात पावसाच्या पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्‍यात संततधार सुरू आहे. चार तासांत तब्बल २१२ मिलिमीटर पाऊस झाल्याने इगतपुरी व सीमावर्ती भागात अनेक दरडी कोसळल्या. प्रमुख रस्ते, दोन बंधारे वाहून जाण्यासोबत रेल्वे वाहतूक ठप्प होण्यापर्यंत घटना सुरू असतानाच दुसरीकडे मात्र दुष्काळी तालुके म्हटल्या जाणाऱ्या तालुक्‍यात मात्र ३० टक्केही पाऊस झालेला नाही. कळवण- सात, देवळा- नऊ, नांदगाव- ११, चांदवड- १३, बागलाण- २४, मालेगाव- २७ टक्केच पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ३३ टक्के पाऊस झाला आहे. मात्र त्यात पाच तालुक्‍यांत २५ टक्केही पाऊस झालेला नाही.

पश्‍चिम भाग केंद्रबिंदू
जिल्ह्यातील धरण पाणीसाठ्यात सरासरी २० टक्के लाभ झाला आहे. मात्र त्यात गंगापूर व दारणा समुहांना लाभ झाला आहे. इतर पालखेड व चणकापूर हे दोन धरण समूह मात्र कोरडेच आहेत. ३८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाची जास्त लागवड होणाऱ्या तालुक्‍यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. खरिपांच्या पेरण्यासाठी अनेक तालुक्‍यांत अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.  त्यामुळे या तालुक्यातील पेरण्या अद्यापही खोळंबल्या आहेत. चांदवड, मालेगाव, बागलाण या टापूत अद्यापही वरुणराज समाधानकारक बरसलेला नाही.

दोन समूहांमध्ये २० टक्के पाणी, दोन समूह कोरडेच
पश्‍चिमेला ३३ टक्के पाऊस, इतरत्र ३० टक्केही नाही
खरीप पेरण्याच्या तालुक्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Monsoon Percentage Less