राजमाता जिजाऊच शिवरायांच्या गुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

धुळे - बालपणापासून ते स्वराज्यनिर्मितीच्या काळात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या, असे प्रतिपादन रायगड येथील शिवचरित्र व्याख्याते व विचारवंत प्रशांत देशमुख यांनी केले.

धुळे - बालपणापासून ते स्वराज्यनिर्मितीच्या काळात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या, असे प्रतिपादन रायगड येथील शिवचरित्र व्याख्याते व विचारवंत प्रशांत देशमुख यांनी केले.

राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त ॲड. झेड. बी पाटील महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेंतर्गत ‘शिवरायांना स्वराज्याचे स्वप्न देणाऱ्या राजमाता जिजाऊ’ या विषयावर श्री. देशमुख यांचे व्याख्यान झाले.  
जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अरुण साळुंके अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव प्रदीप भदाणे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सुधीर पाटील, संचालक ॲड. अजित मोरे, नाना कोर, अनिल चौधरी, शेखर सूर्यवंशी, स्मिता साळुंके, प्राचार्य डॉ. पी. एच. पवार व्यासपीठावर होते. 

श्री. देशमुख म्हणाले, की जिजाऊंनी केलेले मार्गदर्शन व संस्कारांमुळे शिवाजी राजे घडले. शहाजीराजे व जिजाऊ यांनी पाहिलेल्या स्वराजनिर्मितीच्या स्वप्नपूर्तीसह प्राप्तीच्या वाटचालीतील प्रत्येक निर्णय तसेच युद्धाच्या नियोजनात जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. आदिलशाही, निजामशाही आणि कुतूबशाहीच्या अन्याय व अत्याचाराने त्रस्त अशा समाजात आत्मविश्वास निर्माण करत अत्यंत कठीण स्थितीत जिजाऊंनी निर्णयक्षमता तसेच प्रखर इच्छाशक्तीच्या बळावर परकीय तसेच स्वकियांशी संघर्ष केला. शिवरायांचा राज्याभिषेक करून स्त्रियांचा सन्मान असलेले न्याय व कायद्याचे स्वराज्य निर्माण केले. वर्तमान स्थितीत युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जिजाऊंनी स्वराज्यनिर्मितीसाठी दिलेले सर्वोच्च समर्पण व शिवरायांचे कर्तृत्व याचे चिंतन युवा मनावर होणे गरजेचे आहे.  

अध्यक्ष डॉ. साळुंके यांनी राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिलेली स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा याविषयी माहिती दिली. डॉ. योगिता पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले. संयोजन समिती सदस्य प्रा. पी. एस. गिरासे, प्रा. विजयकुमार जवराळ, प्रा. कल्पना देवरे, प्रा. जितेंद्र पाटील, प्रा. समीर शहा, प्रा. संगीता जगदाळे, प्रा. पूनम माळीच, प्रा. रवींद्र पावरा, प्रा. रोहित वाडिले, प्रा. राजेश मावची, दगा बोरसे यांनी संयोजन केले. उपप्राचार्य डॉ. ए. ए. पाटील, डॉ. चुडामण पगारे, उपप्राचार्या डॉ. विद्या पाटील, अनिता पाटील आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajmata Jijau Shivaji maharaj Guru Prashant Deshmukh