राणे भाजपसोबत आले...मग सुरेशदादा का नको? 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

राणे भाजपसोबत आले...मग सुरेशदादा का नको? 

राणे भाजपसोबत आले...मग सुरेशदादा का नको? 

जळगाव : राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. कालचा शत्रू आजचा मित्र होऊ शकतो. कॉंग्रेसमधील कट्टर विरोधकही भाजपसोबत येऊन आमदार झाले आहेत. काहींना महामंडळाची पदेही देण्यात आली आहेत. नारायण राणेंनी भाजपसोबत युती केली, तेही पक्षाने स्वीकारलेच ना? मग सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युतीच्या प्रस्तावाला हरकत काय आहे? त्यामुळे सध्या तरी ही युती तात्त्विकदृष्ट्या मान्य आहे. मात्र, जागावाटपात समन्वय झाला नाही तर भाजप स्वबळावर लढण्यास समर्थ आहे, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 
पक्षाच्या कार्यालयात आज महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज दिवसभर या मुलाखती घेतल्या. 
मुलाखतीनंतर ते म्हणाले, की भाजपने शिवसेनेशी "युती'केली म्हणून भाजपची बेईज्जती झाली असे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही काही रणांगणात पळून गेलोलो नाही, आम्ही पक्षाचा आणि जळगाव शहराच्या विकासाचा विचार केलेला आहे. त्या दृष्टीने आम्हीही "युती'च्या प्रस्तावाची चर्चा करीत आहोत. तीही अद्याप झालेली नाही. राज्यात "युती'साठी आम्ही शिवसेनेकडे जातच आहोत, जळगावात तर आम्ही सुरेशदादांकडे गेलेलो नाही, ते आमच्याकडे आले आहेत. या शिवाय भाजपचाच महापौर करून वर्षभरात महापालिका कर्जमुक्त करून विकास करणार आहोत. 

"सुरेशदादां'सोबत गैर काय? 
ज्यांच्याविरुद्ध तुम्ही संघर्ष केला, त्यांच्या सोबतच तुम्ही "युती' करून प्रचार कसा करणार? या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा "शत्रू'आणि "मित्र'ही नसतो. कॉंग्रेसच्या काही कट्टर लोकांनी भाजपवर टीका केली. अगदी नारायण राणे यांनीही भाजपवर सडकून टीका केली, ते आज आमच्यासोबत आले आहेत. मग सुरेशदादा जैन यांनी शहर विकासासाठी आमच्या सोबत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. आणि जागा वाटपात समझोता होऊन "युती'झाली तर राजकीयदृष्टीने चुकीचे ठरत नाही, असे आपल्याला वाटते. 

"युती' नाही तर जागा वाटप कुठे? 
भाजप आणि शिवसेनेच्या "युती'बाबत ते म्हणाले, की शिवसेना - भाजपची स्थानिक स्तरावर युती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शविली आहे. परंतु अद्यापही युती झालेली नाही. जागेचा कोणताही फार्मुला ठरलेला नाही. भाजप कोणत्याही परिस्थितीत तीस जागा घेणार नाहीच. जागा वाटप झाल्याची ही चर्चा निरर्थक आहे. आमच्या मुलाखती सुरू आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर आम्ही जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहोत. त्यात आमचा समझोता झाला तरच "युती'होईल अन्यथा आमचे मार्ग मोकळे आहेत. 

नाथाभाऊ "युती'वर नाराज नाहीत 
माजी मंत्री एकनाथ खडसे "युती'वर नाराज असल्याबाबत बोलताना ते म्हणाले, नाथाभाऊ आमचे नेते आहेत, ते "युती'वर नाराज नाहीत. आपण याबाबत त्यांच्याशी दोन वेळा बोललो आहोत. आज ते मुक्ताईनगर नगरपंचायतीचा प्रचार नारळ फोडण्यासाठी उपस्थित राहिल्यामुळे येथे आलेले नाहीत. मात्र पुढे त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करण्यात येईल. मात्र "युती'झालेली नाही, त्यांचा केवळ प्रस्ताव आहे. दोन्ही पक्षप्रमुखांनी सहमती दर्शविली आहे.एवढेच आहे. आणि हेच लक्षात घेतले पाहिजे. 

दोन दिवसांत उमेदवार निश्‍चित 
उमेदवार निश्‍चितीबाबत ते म्हणाले, आज आम्ही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत, त्याबाबत आम्ही सर्व पदाधिकारी बसून, चर्चा करणार आहोत. त्यानंतर उमेदवार निश्‍चित करण्यात येईल. आमचे उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर आम्ही शिवसेनेसोबत जागा वाटपाची चर्चा करणार आहोत. त्यामुळे जागा वाटपात समझोता झाल्यावरच "युती'निश्‍चित होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rane