
Nandurbar Crime News : विनयभंग करणाऱ्यास 3 वर्ष सश्रम कारावास
नंदुरबार : शहरातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास तीन वर्ष सश्रम कारावास व १० हजार रूपयांचा दंड मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने ठोठावला आहे. (Rapist gets 3 years rigorous imprisonment Nandurbar Crime News)
याबाबत माहिती अशी, शहरातील चंद्रशेखर मुरलीधर भस्मे (वय ४९, रा. नुतन हायस्कुलसमोर, नंदुरबार) याने महिलेचा विनयभंग केला होता. याबाबत संबधित महिलेने नंदुरबार शहर पोलिसांत तक्रार दिली होती.
त्यावरून भस्मे यास ११ नोव्हेंबर २०१९ला तत्काळ अटक करण्यात आली होती. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रियदर्शनी थोरात यांनी या प्रकरणाचा तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
तसेच, भस्मे याच्याविरूद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद चव्हाण यांनी साक्षीदारांचे जबाब, पंच आणि परिस्थितीजन्य पूरावे, तपास अधिकारी यांची साक्ष, सरकारी पक्षाचा युक्तीवाद या सर्व बाबींचा विचार करुन भस्मे यास ३ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याचा तपास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबारचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, नंदुरबार शहरचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रियदर्शनी थोरात यांनी केला.
न्यायालयात अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सुनील पाडवी यांनी, तर पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे, पोलीस हवालदार गणेश धनगर, मनोज साळुंखे, पोलीस नाईक गिरीश पाटील यांनी कामकाज पाहिले.