जिल्ह्यातून चार लाख क्विंटल केळीची होणार निर्यात

banana
banana

रावेर  : अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस उशिरा जिल्ह्यातून या हंगामातील नियमित केळी निर्यातीला सुरुवात झाली आहे. या वर्षीही जूनच्या मध्यापर्यंत होणाऱ्या निर्यातीत मागील वर्षीपेक्षा दुप्पट म्हणजे साडेतीन- चार लाख क्विंटल केळी निर्यात यंदा होण्याची अपेक्षा आहे. सर्वाधिक निर्यात अरब देशात होणार आहे. 

९ आणि १० फेब्रुवारीला यावल तालुक्यातील चितोडा येथील अतुल लिलाधर पाटील यांची केळी जैन इरिगेशनच्या माध्यमातून कापण्यात आली. प्रत्येकी तेरा किलोच्या खोक्यात पॅकिंग करून ही केळी जळगावच्या जैन इरिगेशनमधील प्रीकुलिंग सेंटरमध्ये ठेवण्यात आली आहे. तेथून १५ फेब्रुवारीला कंटेनरमध्ये भरून ही केळी मुंबई मार्गे जहाजातून अरब देशात निर्यात होणार आहे. 

यावर्षी थंडीमुळे निर्यातक्षम केळी कापणीला नेहमीपेक्षा पंधरा दिवस उशीर झाला आहे. थंडीचा परिणाम (चिलिंग इंजुरी) काही प्रमाणात केळीवर झाला आहे. यामुळे केळी पिकल्यानंतर पिवळी धम्म न दिसता, काहीशी तपकिरी रंगाची दिसते. अशा केळीला परदेशात फारशी मागणी नसते. आता ऊन व तापमान वाढू लागल्याने चीलिंग इंजुरीचा प्रभाव नगण्य असून जसे ऊन वाढेल तसेच केळी निर्यातीला वेग येणार आहे. 

दुप्पट निर्यात होणार 
मागील वर्षी जिल्ह्यातून सुमारे ८०० कंटेनर्स केळी निर्यात झाली होती. यावर्षीही निर्यात दुपटीपेक्षा जास्त होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी जैन इरिगेशन ५०० कंटेनर्स, महाजन बनाना, तांदलवाडी - ४५० कंटेनर्स, रूचि बनाना, अटवाडा- रावेर- ३०० कंटेनर्स, एकदंत बनाना एक्स्पोर्ट्स, तांदलवाडी- ४५० कंटेनर्स, महाराष्ट्र बनाना, रावेर- १०० कंटेनर्स, अमोल पाटील, कुंभारखेडा- ३०० कंटेनर्स व अन्य सुमारे शंभर कंटेनर्स मिळून जिल्ह्यातून दोन हजार कंटेनर्स म्हणजे सुमारे साडेतीन- चार लाख क्विंटल केळी निर्यात होण्याची अपेक्षा आहे. 

या देशात होणार निर्यात 
यावर्षी जिल्ह्यातील केळी इराक या देशात सर्वाधिक निर्यात होणार आहे. तसेच ओमान, सौदी अरेबिया, दुबई आणि अफगाणिस्तान या देशातही मुंबईतून समुद्रमार्गे निर्यात होणार आहे. मागील वर्षापासून पाकिस्तानला केळी निर्यात होणे थांबले आहे. पाकिस्तानमधील निर्यात सुरू असती, तर केळीची मागणी आणखी वाढून भावही आणखी वाढले असते. 

अनुकूलतेचा फायदा घ्या : पाटील 
के. बी. पाटील (केळी तज्‍ज्ञ)ः जगातील प्रथम क्रमांकाचा केळीचा निर्यातक देश असलेल्या ईक्वाडोर या देशात वादळ आणि पुरामुळे यामुळे तेथील केळीचे नुकसान झाले आहे. तर निर्यातीत जगात दुसरा क्रमांक असलेल्या फिलिपाईन्स या देशात या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे केळीचे नुकसान झाले आहे. आगामी तीन-चार महिन्यात जिल्ह्यातील केळी अधिक प्रमाणात निर्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दर्जेदार केळी निर्यात केली तर परदेशात जिल्ह्यातील केळीला कायमची बाजारपेठ मिळून ती टिकून राहील; याचा फायदा घेण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले. 

लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे 
कस्टम विभागाचे अधिकारी मुंबई येथे पाठवलेली केळी उतरवून तपासणी करतात. त्या ऐवजी त्यांनी जिल्ह्यातच कार्यालय उघडल्यास येथूनच केळीची तपासणी करून कंटेनर सीलबंद करून पाठविता येईल, त्यामुळे पैसा आणि वेळही वाचेल. याबाबत खासदार रक्षा खडसे आणि खासदार उन्मेष पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. तसेच केळी निर्यातीसाठी लागणारे कंटेनर्स मुंबईहून मागवावे लागतात ते औरंगाबाद येथे उपलब्ध झाल्यास केळी उत्पादक शेतकऱ्यांचे पंधरा ते वीस हजार रुपये प्रत्येक कंटेनर मागे वाचतील आणि केळी निर्यातीला चालना मिळू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com