चारा-पाणी नाही; गुरे बाजारात

लुमाकांत नलवडे
बुधवार, 17 एप्रिल 2019

गुरांसाठी चारा आणि पाणी नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांनी बैल, म्हैस अशी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणल्याचे चित्र सावदा येथील आठवडी गुरांच्या बाजारात दिसून आले. ‘सरकार ना पाणी देते, ना चारा देते, शेतकऱ्यांनी काय करायचे?’ अशी खंतही काही शेतकरी आणि गुरांच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

गुरांसाठी चारा आणि पाणी नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांनी बैल, म्हैस अशी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणल्याचे चित्र सावदा येथील आठवडी गुरांच्या बाजारात दिसून आले. ‘सरकार ना पाणी देते, ना चारा देते, शेतकऱ्यांनी काय करायचे?’ अशी खंतही काही शेतकरी आणि गुरांच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातही चारा छावण्यांची गरज असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

जळगावमधून आम्ही रावेर मतदारसंघाकडे निघालो. जाताना आम्हाला सावदा येथे कृषी उत्पन्न उप बाजार समिती दिसली. मोठ्या प्रमाणात गुरे दिसल्यामुळे आम्ही बाजारात शिरलो. शेतकरी आणि व्यापारी दोघेही चिंताग्रस्त दिसत होते. तेथे सचिव गोपाळ महाजन आणि उपसचिव नितीन महाजन यांची भेट घेतली. प्रत्येक आठवडी बाजारात दीड-दोन कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. गुरे का विकली जात आहेत?

त्यावर ‘ना चारा, ना पाणी, ती जगवायची कशी?’ असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असल्याचे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील जामठी, खामगाव यासह रावेर तालुक्‍यातील शेतकरी व्यापारी बाजारात गुरांसह उभे होते. ७५ ते ८० हजार रुपयाला बैल जोडी जायला पाहिजे होती. ती केवळ तीस हजार रुपयाला विक्री केल्याचे शेतकऱ्याने सांगितले. ‘विक्री का केली’, असे विचारले असता चारा नाही, पाणी नाही. किती दिवस पोसणार?’ अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिले. 

‘‘चारा, पाणी मिळत नाही, दुधाला १८ रुपयेप्रमाणे लिटर दर मिळतो, आज पाणीसुद्धा वीस रुपये लिटरने विकले जाते. तुम्ही सांगा गुरांना जगवणार कसे? लोकसभा निवडणुकीत पाण्याचा, चाऱ्याचा विषय चर्चेतही येत नाहीत.

अलीकडे तर मते मागायलाही कोणी येईना. आता जनावरांसाठी कुणाकडे जायचे म्हणून थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहेत,’’ अशी व्यथा काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reporter Diary Lumakant Nalawade Fodder Water Animal