esakal | गौण खनिजाची रॉयल्टी चुकविणे सरपंचासह सात जणांना पडले महागात 
sakal

बोलून बातमी शोधा

गौण खनिजाची रॉयल्टी चुकविणे सरपंचासह सात जणांना पडले महागात 

चौकशीअंती ३० लाख ६४ हजार रुपयांची रॉयल्टी चुकविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सरपंचांसह सात जणांच्या सातबाऱ्यावर त्या रकमेचा बोजा चढविला.

गौण खनिजाची रॉयल्टी चुकविणे सरपंचासह सात जणांना पडले महागात 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : विनापरवानगी गौण खनिजाचा वापर सावर्जनिक कामासाठी करून रॉयल्टी चुकविल्याप्रकरणी बलवंड (ता. नंदुरबार) येथील सरपंचासह सात जणांवर महसूल विभागाने कारवाई केली. त्यात सात जणांच्या सातबाऱ्यावर ३० लाख ६४ हजारांची रॉयल्टी रकमेचा बोजा चढविण्याचे आदेश तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी संबधित तलाठ्यांना दिले आहेत. 

आवश्य वाचा- शिक्षक पती-पत्‍नीचे निवृत्तीनंतर धाडस; पासष्टीच्या वयात त्यांनी ‘कळसूबाई’चे शिखर केले सर 
 


बलवंड (ता. नंदुरबार) येथील ग्रामपंचायतीने २०१० ते २०१८ या कालावधीत सुरू असलेल्या गावातील सार्वजनिक कामासाठी आवश्यक असलेले गौण खनिज गावातूनच विनापरवानगी काढून वापरले होते. त्याबाबत परवानगी तर नाहीच घेतली मात्र त्या गौण खनिजाची रॉयल्टीही चुकविली. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाने सरपंच सागर पाटील, पांडुरंग पाटील, पंकज पाटील, लक्ष्मण पाटील, बन्सीलाल भोई, विवेक पाटील, संदीप पाटील यांना  रॉयल्टीची रक्कम भरणा करण्यासाठी नोटीस बजावली होती.

आवर्जून वाचा- गट-तट विसरा आणि कामाला लागा; यश निश्चीत मिळेल !

तरीही त्या नोटिशीची दखल न घेता दुर्लक्ष केले. या प्रकरणाकडे मनसेचे धुळे-नंदुरबार संपर्कप्रमुख अतुल पाटील, प्रकाश पाटील, जितेंद्र शिंपी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, राजेंद्र सुभाष पाटील, गुलाब भिल, रणसिंग राजपूत, कैलास पाटील यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार प्रांताधिकारी वसुमना पंत यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीअंती ३० लाख ६४ हजार रुपयांची रॉयल्टी चुकविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सरपंचांसह सात जणांच्या सातबाऱ्यावर त्या रकमेचा बोजा चढविण्याचे आदेश तहसीलदार थोरात यांनी गावाचे तलाठी यांना दिले आहेत. 

नाव व कंसात रॉयल्टी रक्कम 
सागर पाटील (एक लाख), पांडुरंग पाटील (१५ लाख ७९ हजार), पंकज पाटील (सात लाख पाच हजार), लक्ष्मण पाटील (२४ हजार), बन्सीलाल भोई (पाच लाख), विवेक पाटील (एक लाख २६ हजार), संदीप पाटील (३० हजार) असे एकूण ३० लाख ६४ हजार रुपये.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे