Dhule Politics News : सत्ताधाऱ्यांचा संताप; मनपाचे ‘गल्ली ते मुंबई’ धिंडवडे जिव्हारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ruling BJP members raised  tone in municipal standing committee meeting that BJP is being defamed dhule news

Dhule Politics News : सत्ताधाऱ्यांचा संताप; मनपाचे ‘गल्ली ते मुंबई’ धिंडवडे जिव्हारी!

धुळे : महापालिकेच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलनाचे काम करणाऱ्या स्वयंभू ट्रान्स्पोर्टच्या येथील प्रकल्प व्यवस्थापकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलकांनी केलेली मारझोड, त्यानंतर स्वयंभूच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन, कामबंद तसेच धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेत मांडलेले धुळे शहरातील विविध प्रश्‍न याचा संदर्भ देत आपली (भाजप) बदनामी होत असल्याचा सूर स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजप सदस्यांनी लावला. (ruling BJP members raised tone in municipal standing committee meeting that BJP is being defamed dhule news)

याबाबत त्यांनी प्रशासनालाही विविध प्रश्‍न विचारून धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी (ता. २३) सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली. सभापती किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

मंगळवारी (ता. २१) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलकांनी कचरा संकलन करणाऱ्या स्वयंभू ट्रान्स्पोर्टच्या प्रकल्प व्यवस्थापकाला मारहाण केली. अंगावर शाई, अंडे फेकून मारले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वयंभू कंपनीच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात आंदोलन करून कारवाईची मागणी केली, कामबंद केले.

या दोन्ही आंदोलनांचा संदर्भ घेत गुरुवारी (ता. २३) स्थायी समितीत सत्ताधारी भाजप सदस्य बैसाणे यांनी स्वयंभू ट्रान्स्पोर्टसह अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍न उपस्थित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन निषेधार्ह असल्याचे म्हणतानाच श्री. बैसाणे यांनी स्वयंभूलादेखील धुळेकरांबद्दल अवमानकारक बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. ठेकेदार लाखो, कोट्यवधी रुपये कमावतोय.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

मात्र, अटी-शर्तींप्रमाणे काम होतेय का, असा प्रश्‍न आहे. याबाबत आपण प्रशासनाला तीन पत्रे दिली, मात्र त्याकडे लक्षही दिले नाही. स्वयंभूच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद करून धुळेकरांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांचे आंदोलन, कामबंद नियमानुसार होते का, आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांकडून तुम्ही सुटीच्या दिवशीही निवेदन स्वीकारता, प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली. याबाबत नियमानुसार कार्यवाही होईल, असे अतिरिक्त आयुक्त कापडणीस म्हणाले. या विषयावर स्वतंत्र बैठक घेऊ, असे सभापती श्रीमती कुलेवार म्हणाल्या.

विधानसभेपर्यंत बदनामी

धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी धुळे शहरातील विविध कामांचा संदर्भ देत निकृष्ट कामे व आनुषंगिक प्रश्‍न विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केले. यातून आपली बदनामी होत असल्याचे श्री. बैसाणे म्हणाले.

सत्ताधारी भाजप सदस्य रेलन म्हणाले, की आमदार पाटील यांनी हद्दवाढ क्षेत्रात कामे नाहीत, पण करवसुली होतेय असे सांगितले, त्यांच्या या विधानाशी मी सहमत नाही. एका दिवसात हॉलीवूड होत नाही, हद्दवाढ क्षेत्रात झालेल्या कामांची यादी सादर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

फक्त पैसे खाण्यासाठी का?

हद्दवाढ क्षेत्रातून अवास्तव कर आकारणी होत असल्याचे म्हणत सदस्य किरण अहिरराव यांनी या विषयावर आपल्या पत्रांसह राज्य शासनानेही विचारणा केली, मात्र प्रशासनाने उत्तर दिले नाही, अशी माहिती दिली. तसेच लोकप्रतिनिधींना ८० टक्के मान असतो. धुळे मनपात मात्र तो प्रशासनाला आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.

हद्दवाढ क्षेत्र फक्त पैसे खाण्यासाठी आहे का, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, अवास्तव कर आकारणीप्रश्‍नी आंदोलन करण्यास प्रशासन भाग पाडत असल्याचेही श्री. अहिरराव म्हणाले. सदस्य नरेश चौधरी यांनीही सर्वांत जास्त कर हद्दवाढ क्षेत्रात लावल्याचे म्हणत कर कमी करण्याबाबत दिरंगाई करू नका अन्यथा निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसेल, असा इशारा दिला.

घरपट्टी निर्लेखनावर आक्षेप

शहरातील स्टेशन रोड अतिक्रमणधारकांकडील मालमत्ता कर ५१ लाख ६५ हजार ३६९ व पाणीपट्टी तीन लाख ६० हजार ९०६ रुपये तसेच पांझरा चौपाटी येथील मालमत्ता कर एक लाख ६६ हजार ४३८ व पाणीपट्टी १३ हजार रुपये थकीत आहे. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी सध्या कोणत्याही मालमत्ता नसल्याने ही थकबाकी निर्लेखित करण्याचा विषय समितीपुढे होता.

मात्र, आजघडीला तेथे मालमत्ता नाहीत याची प्रशासनाने खात्री केली आहे का, जागा रिकामी आहे का, तसेच संबंधितांना सुविधा दिल्या आहेत ना मग एवढ्या रकमा सोडून द्यायच्या का, असे प्रश्‍न सदस्य रेलन यांनी उपस्थित केले. सदस्य बैसाणे यांनीही याबाबत वकिलांचा सल्ला घ्या, धोरण ठरवा, अशी मागणी केली. त्यामुळे हा विषय तहकूब करण्यात आला.