शेतकरी तरुणाईला दिले उद्योजकतेचे बाळकडू

निखिल सूर्यवंशी
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

तज्ज्ञांनी दाखविली प्रक्रिया उद्योगांची वाट; आत्मविश्‍वासाची केली पेरणी
नाशिक - शेती क्षेत्राशी निगडित प्रश्‍नांवर चिंता वाहत बसण्यापेक्षा, शासनशरण प्रवृत्ती न ठेवता हिमतीच्या बळावर शेतकरी तरुणाईनेही आता प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उद्योजकतेची कास धरली पाहिजे, असे सांगत अनेक तज्ज्ञ, अभ्यासकांनी आज निरनिराळ्या प्रक्रिया उद्योगांची माहिती देत उपस्थितांमध्ये आत्मविश्‍वासाची पेरणी केली. त्यामुळे उपस्थित दोन हजारांवर शेतकरी प्रभावित झाले. त्यांनी संबंधित तज्ज्ञांना गराडा घालत त्या उद्योगांविषयी अधिकची माहिती घेतली.

तज्ज्ञांनी दाखविली प्रक्रिया उद्योगांची वाट; आत्मविश्‍वासाची केली पेरणी
नाशिक - शेती क्षेत्राशी निगडित प्रश्‍नांवर चिंता वाहत बसण्यापेक्षा, शासनशरण प्रवृत्ती न ठेवता हिमतीच्या बळावर शेतकरी तरुणाईनेही आता प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उद्योजकतेची कास धरली पाहिजे, असे सांगत अनेक तज्ज्ञ, अभ्यासकांनी आज निरनिराळ्या प्रक्रिया उद्योगांची माहिती देत उपस्थितांमध्ये आत्मविश्‍वासाची पेरणी केली. त्यामुळे उपस्थित दोन हजारांवर शेतकरी प्रभावित झाले. त्यांनी संबंधित तज्ज्ञांना गराडा घालत त्या उद्योगांविषयी अधिकची माहिती घेतली.

येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात झालेल्या तीन दिवसीय ‘सकाळ- ॲग्रोवन’ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेचा समारोप झाला. चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) मूळ रहिवाशी आणि ‘सीफेट’चे माजी संचालक, भोपाळस्थित बेनेवोल कल्याण संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. टी. पाटील, केवळ पाच वर्षांत द्राक्षासंबंधी उद्योगातून दोनशे कोटींची उलाढाल करून दाखविणारे तरूण उद्योजक व सह्याद्री ॲग्रो फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शेतकरी तरूणाईलाही उद्योजकतेचे बाळकडू दिले. 

परिषदेचे वेगळे वैशिष्ट्य
परिषदेच्या उद्‌घाटन सत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नावीन्यपूर्ण प्रक्रिया उद्योगांबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांना नवप्रेरणा दिली. नंतर आज अन्य तज्ञांनी ‘पीपीटी’ व्दारे शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगांची वाट धरण्याचा आग्रह धरून त्यांच्यात आत्मविश्‍वासाचीही पेरणी केली.

फलोत्पादन क्षेत्रावर आधारित कमी खर्चात आणि घरगुतीस्तरावरही कुठले प्रक्रिया सुरू करता येऊ शकतात, याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे उपस्थित सर्वच प्रभावीत झाले. परिषदेचे हे वेगळे वैशिष्ट्य ठरले.

जळगावकरांना सल्ला
डॉ. पाटील म्हणाले, की जळगावला मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन होते. त्यावर आधारित ‘चीप्स’चे उद्योग उभारण्याची मानसिकता आता तयार झाली. त्यावरच न थांबता इतर आणि शेतकरी तरूणाईने केळीपासून जॅम तयार करण्याचा उद्योग सुरू करावा. त्यासाठी दहा ते वीस हजाराचे भांडवलही पुरेसे आहे. घरगुतीस्तरावर हा व्यवसाय सुरू होऊ शकतो. जॅमची क्रेझ आणि मागणी वाढती असल्याने या व्यवसायात शेतकरी, तरूणाईने पावले टाकली तर वैयक्तिक आणि गावाचेही अर्थकारण बदलू शकेल.  

फलोत्पादन क्षेत्रात खूप काही 
सध्याचा ‘इन्स्टंट’ जमाना आहे. डाळींबाचे दाणे किंवा रस विक्रीतून चांगले व्यावसायिक होता येईल. त्यासाठी फार भांडवलाची गरज नाही. हॉटेल व्यावसायिकांसह महिला वार्गाला लसूण सोलण्याचा कधीकधी कंटाळा येतो. ते लक्षात घेऊन उदयपूर येथे लसणाचे काप करणारे यंत्र मिळू लागले आहे. दोन लाख किमतीचे तीन यंत्रांचे संच लसूण सोलण्यापासून काप करण्याचे काम करते. ते नंतर उन्हात वाळवले, तर सहा महिने लसणाचे काप उपयोगात येऊ शकतात. ते चांगल्या पॅकेजिंगव्दारे विक्री करता येऊ शकतात. कांद्याचे आयुर्वेदातही महत्व असून, उन्हात तो जवळ ठेवला जातो, कांद्याचा रस टक्कल असलेल्या व्यक्तीने लावला, तर केसांची वाढ होते, असाही उल्लेख आहे. अंड्यापासून शाम्पू होऊ शकतो, तर कांद्याच्या रसापासून तो का शक्‍य नाही? हिमतीने असे प्रयोग अंगिकारावे, असे सांगत मिरची, आल्याची पावडर, तसेच अनेक फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग आणि त्यांची उपयुक्तता विशद करत डॉ. पाटील यांनी उद्योजकतेची वाट उपस्थितांना दाखविली. अशा उद्योगासाठीची यंत्रसामग्री, प्रशिक्षण संस्थांची माहिती त्यांनी दिली. 

गाव तरुणांनी एकत्र यावे
ग्राहकाला काय हवे, याचा सारासार विचार करून प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो. त्यासाठी शासनाकडून काही मिळावे, त्यात वेळ घालविण्यापेक्षा चार ते पाच तरूणांनी एकत्र येऊन, भागभांडवल टाकून प्रक्रिया उद्योग सुरू करावा. त्यात कुठलीही स्पर्धा मानू नये. कारण घेणारे हजारो ग्राहक आहेत. त्यांना आकर्षित करणे, त्यासाठी चांगली पॅकेजिंग व विक्रीचे तंत्र अवलंबून गावापासून महानगरापर्यंतची बाजारपेठ काबीज करावी, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal agrowon & National Horticultural Council send up