चक्‍क मुलाने फौजदारालाच उभे केले न्यायालयात 

रईस शेख
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

मुलाने थेट बालहक्क आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने दखल घेतल्यानंतर मात्र पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. अखेरीस संबंधित ठाण्यातील फौजदारास बालहक्क न्यायालयासमोर उभे राहावे लागले. 

जळगाव : गेल्या आठवड्यात बालहक्क दिन साजरा होत असताना जळगाव शहरातील अल्पवयीन मुलाने आई- वडिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्यालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. याविरोधात मुलाने थेट बालहक्क आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने दखल घेतल्यानंतर मात्र पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. अखेरीस संबंधित ठाण्यातील फौजदारास बालहक्क न्यायालयासमोर उभे राहावे लागले. 

सिंधी कॉलनीत दोन भावंडांच्या एकत्र कुटुंबात जन्मलेल्या नवनीत (काल्पनिक नाव) हा ऍड. एस. ए. बाहेती महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत इयत्ता बारावीचे शिक्षण घेत आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या शैक्षणिक जीवनात "स्कॉलर' राहिलेला हा मुलगा सध्या निर्वासिताचे आयुष्य जगण्यास मजबूर झाला आहे. 

नवनीतची आपबिती अशी 
वडिलोपार्जित मिळकत असलेल्या घरात त्याचे आई-वडील, काका-काकू व त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास असून हिस्से वाटणीवरून या कुटुंबात वाद सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी सप्टेंबर महिन्यात त्याच्यासह वडिलांवर राहत्या घरातच प्राणघातक हल्ला झाला. त्यासंबंधीचा व्हीडीओ त्याने बालहक्क आयोगाला दिला आहे. घडला प्रकार मोबाईलमध्ये शूट केला म्हणून त्याला व त्याच्या आईलाही मारहाण झाली. वडिलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून माय-लेक एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोचले. 

वरिष्ठांकडे तक्रारीचा राग 
आईला सोडून नवनीत परीक्षेला गेला, पेपर देऊन परतल्यावर संध्याकाळी पोलिस ठाण्यात आला या ठिकाणी रात्री साडेआठपर्यंत थांबूनही तक्रार घेतली जात नाही, उलट अपराध्याची वागणूक दिली जाते म्हणून त्याने थेट डीवायएसपी डॉ. निलाभ रोहन यांना संपर्क केला. डीवायएसपींनी चौकशी केली अन्‌ येथेच चुकले.. निरीक्षक साहेबांनी नवनीतला बोलावून आरोपीसारखे केबिनमध्ये झोडपून शिवीगाळ केली. आईलाही त्रास देत असल्याचे पाहून तो अस्वस्थ झाला. 

अखेरीस आयोगाकडे तक्रार 
बालहक्क दिनी ई-मेलद्वारे तक्रार दिली. वडील मंदिरात (सेवालयात), आई बंद घरात एकटीच राहते, आणि आता तक्रार केल्यावर मुलाला निरीक्षणगृहात राहण्याची वेळ आलीय.. घडल्या प्रकारातून व्यथित या बालकाने पत्रातून सहकुटुंब आत्महत्येची इच्छाही व्यक्त केली आहे. 

यंत्रणा हलली.. तरी! 
बाल हक्क आयोगाच्या तक्रारीनंतर यंत्रणा हलली, मारहाण केलेल्या फौजदाराला बाल-न्यायालयात हजर राहावे लागले, कुटुंबाला त्रास देणाऱ्या काकाच्या कुटुंबाचाही जाबजबाब झाला. मात्र, या सर्वांवर एका लोकप्रतिनिधीचा प्रभाव असल्याचे बोलले जात असून त्यामुळे सोयीनुसार पात्र हलवले जात असून तक्रारीला "क्रॉस कम्प्लेंट'ने प्रत्युत्तर दिले जात आहे. अशी माहिती पीडित मुलाच्या वडिलांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal exclusive jalgaon bal hakk court police