किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मंगळवारपासून नाशिकमध्ये सुरवात

residential photo
residential photo

नाशिक ः किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मंगळवारपासून (ता. 27) सुरवात होईल. एकलहरे येथील औष्णीक वीजनिर्मिती प्रकल्प सकाळी अकराला उद्‌घाटन होईल. कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा वसुंधरा सन्मान पुरस्कार विजेते रामदास कोकरे यांच्या हस्ते वसुंधरा पुरस्कार प्रदान करण्यात येतील. नाशिकमधील किर्लोस्कर इंजिन ऑईलचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मकरंद देवधर हे उपस्थित राहतील. 
वसुंधरा स्वच्छता अभियान संस्थेचे अध्यक्ष अनिल गायकवाड यांना वसुंधरा सन्मान, तर प्लास्टिक बाबत प्रबोधन करणारे मिलींद पगारे आणि पत्रकार भावेश ब्राह्मणकर यांना वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात येईल. चार दिवसीय महोत्सवातंर्गत नाशिकमध्ये गुरुवारी (ता. 29) प्लास्टिक विरहित दिवस साजरा करण्यात येणार आहे. किर्लोस्कर समूह आणि वसुंधरा क्‍लबतर्फे तरुण व मुलांना पर्यावरण समस्यांप्रती संवेदनशील बनवण्याचे प्रयत्न करण्यासाठी देशातील 30 शहरात वेगवेगळ्या टप्प्यात हा महोत्सव होतो. या महोत्सवाचा विषय 'प्लास्टिकला नकार, वसुंधरेला होकार' असा असेल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे लघुपट, अनुबोधपट आणि पर्यावरणविषयक अन्य उपक्रम महोत्सवात असता. "वसुंधरा जगवा, तगवा आणि भावी पिढ्यांसाठी तिचे संवर्धन करा' हा संदेश असलेला हा महोत्सव पर्यावरण, वन्यजीवन, ऊर्जा, हवा व पाणी या विषयांना समर्पित आहे. पर्यावरणविषयक जागृती आणि कृती यांची प्रेरणा दृक-श्राव्य माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे, हे महोत्सवाचे ध्येय आहे. महोत्सवातंर्गत 45 हून अधिक लघूपट आणि अनुबोधपट महाविद्यालय-शाळांमधून दाखवण्यात येतील. व्याख्याने, छायाचित्र प्रदर्शन, चर्चासत्र, कार्याशाळा, औष्णीक वीजनिर्मिती प्रकल्पाला भेट असे उपक्रम असतील. महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव यांनी ही माहिती दिली. 

पुरस्कारार्थींची माहिती 

अनिल गायकवाड ः राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतून प्रमुख तांत्रिक अधिकारी म्हणून निवृत्त झालेत. जागतिक तापमान वाढ व होणारे बदल याचा 45 वर्षे अभ्यास करून या संकटांचा सामना करण्यासाठी 2006 मध्ये वसुंधरा स्वच्छता अभियान संस्थेची स्थापना केली. रामनदी स्वच्छता अभियान व पुनरुजीवन मोहिमेचे संस्थापक सदस्य आहेत. पुणे येथील बाणेर, पाषाण, म्हाळुगे व घोरावडेश्‍वर या भागात स्वच्छता कार्यक्रम, झाडे लावणे व जगवणे, नैसर्गिक शेती प्रशिक्षण व शिवार फेरी आयोजन केले. विविध ठिकाणी 25 हजारांहून अधिक स्थानिक जातीची झाडे लावून लोकचळवळीच्या माध्यमातून त्यांनी जगवली. तसेच तडवळे (जि. सातारा) येथे टॅंकरमुक्तीसाठी झाडे लावली व ओढ्यावर 7 लहान बंधारे बांधले. पाचवड येथे लोकसहभागातून एक सिमेंट बंधारा बांधला. 

मिलीद पगारे ः 1976 पासून देश आणि देशाबाहेरील कामाचा अनुभव आहे. कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामागे प्लास्टिकचा अनिर्बंध वापर हे कारण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यात शाळा, महाविद्यालये, सहकारी व खाजगी कार्यालये, सार्वजनिक कार्यक्रमातून पाचशेहून अधिक जनजागृतीचे उपक्रम राबवले. एका तासात प्लास्टिकच्या उगमापासून ते त्याचे दुष्परिणाम व त्यापासून बचावाचे सोपे उपाय यावर दृक्‌-श्राव्य माहिती दिली देतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com