‘सकाळ’चे वृत्त पाहून पालकमंत्र्यांनी चारा छावणीचे दिले आश्‍वासन 

दीपक कच्छवा 
रविवार, 19 मे 2019

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) -  दै. ‘सकाळ’मधील ‘टंचाईच्या झळा’ पानावरील ‘दुष्काळ उठला गुरांच्या जिवावर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेले वृत्त पाहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चारा छावण्या सुरू करण्याचे आश्‍वासन पशुपालकांना दिले. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) -  दै. ‘सकाळ’मधील ‘टंचाईच्या झळा’ पानावरील ‘दुष्काळ उठला गुरांच्या जिवावर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेले वृत्त पाहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चारा छावण्या सुरू करण्याचे आश्‍वासन पशुपालकांना दिले. 

हिरापूर (ता. चाळीसगाव) येथे  दुष्काळी दौऱ्यानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले असता, उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून टंचाई परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. आमदार उन्मेष पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे आदी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हिरापूर गावात सकाळी साडेनऊच्या सुमारास आगमन झाले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारील हॉलमध्ये त्यांनी शेतकऱ्यांशी दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा केली. चाळीसगाव तालुक्यात चारा टंचाईने पशुपालक त्रस्त झाले आहेत. पशुसंवर्धन विभागाने चारा बियाणे वाटले खरे. मात्र, पाण्याअभावी चाऱ्याचे उत्पादनच झाले नाही. दिवसेंदिवस वाढत जाणारा उन्हाचा तडाखा आणि उद्भवलेली दुष्काळजन्य स्थिती, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, गाव पातळीवर शासनाच्या न पोचलेल्या विविध योजना अशा कारणांमुळे गुरांची संख्या घटत आहे. या संदर्भातील वस्तुनिष्ठ वृत्त आजच्या ‘सकाळ’च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. पालकमंत्री दुष्काळी परिस्थितीबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती सांगत असतानाच हिरापूरमधील पशुपालक खासाब पठाण यांनी ‘सकाळ’मधील वृत्त पालकमंत्र्यांना दाखवले. हे वृत्त त्यांनी वाचून शेतकऱ्याची व्यथा समजून घेतली. चारा छावण्या सुरू करण्यासाठी सामाजिक संस्था व संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे सांगून अशा संस्थांना शासन अनुदान देखील देईल असे त्यांनी सांगितले. 

‘सकाळ’मधील वृत्ताचे कौतुक  
दरम्यान, चाळीसगाव तालुक्यात यावर्षी चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेले असतानाही चारा मिळणे कठीण झाले आहे. ज्वारीच्या शंभर पेंढ्या पाच हजार रुपये तर बाजरीच्या शंभर पेंढ्या साडेतीन हजारात मिळत आहे. त्यात वाहतूक खर्च वेगळा असल्याने हा चारा परवडेनासा झाला आहे. या संदर्भात आजच्या ‘सकाळ’मध्ये झळकलेल्या बातमीतून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय समाजासमोर मांडला गेला. ज्या वृत्ताने पालकमंत्र्यांचेही लक्ष वेधले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘सकाळ’चे कौतुक केले. 

चारा छावण्या या व्यक्तीला नव्हे तर संस्थांना दिल्या जातात. त्यामुळे जास्तीत जास्त संस्थांनी चारा छावण्यांसाठी पुढे यावे. त्यांना शासनाकडून योग्य ते सहकार्य केले जाईल. 
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal news impact chandrakant patil assured the fodder camp