प्राचीन मंदिरे-वाड्यांचे गाव चांदोरी

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

नाशिक ः  गोरक्षनाथाची जन्मभूमी म्हणून ओळखला जाणाऱ्या चांदोरी (ता. निफाड) गावाला पूर्वी चंद्रगिरी नावाने देखील संबोधले जात असे. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जागृत आणि परंपरेने मानाच्या स्थानांपैकी एक आहे. नाशिकच्या १८८८ मधील गॅझेट मध्ये या गावाचा इतिहास आहे.

नाशिक ः  गोरक्षनाथाची जन्मभूमी म्हणून ओळखला जाणाऱ्या चांदोरी (ता. निफाड) गावाला पूर्वी चंद्रगिरी नावाने देखील संबोधले जात असे. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जागृत आणि परंपरेने मानाच्या स्थानांपैकी एक आहे. नाशिकच्या १८८८ मधील गॅझेट मध्ये या गावाचा इतिहास आहे.

चांदोरी गावचे जहागीरदार सरदार भाऊसाहेब हिंगणे यांचा हिंगणे वाडा इतिहादाची साक्ष देत आजही सुस्थितीत  उभा आहे. 1721 मधील हिंगणे वाडा देशात प्रसिद्ध आहे. या वाडयाला महादेवभट हिंगणे यांचा मोठा इतिहास आहे.  ते नाशिकचे अॅडमीनिस्ट्रेटर होते. त्यांना 1718 मध्ये बहादुरकी मिळाली व त्यांना चांदोरीसह पाच गावांची  जहागिरी दिली. तसेच दिल्लीची वकिली देखील  त्यांनी केली होती. अश्या या हिंगणे वाड्यात त्यांचे वंशज आबासाहेब हिंगणे हा वाडा सांभाळत आहेत. चारशे वर्षापूर्वीचा मतकरी वाड्यामधील दक्षिण मुखी रामाचे मंदिर गावाचे वैभव असून वर्षभरात अनेक उत्सव या गावात साजरे केले जातात. मतकरी वाड्यातील रामजन्मोत्सव व दक्षिणाभिमुख राममंदिर महाराष्ट्रात आगळेवेगळे आहे. राम, सीता, लक्ष्मण व हनुमानाच्या मूर्ती कायम चौपाळ्यावर असतात. वाड्यातील शंकराची पिंड स्वयंभू आहे. पूर्व-पश्‍चिम पिंडी हे या मंदिराचे वैशिष्ट आहे. रामनवमीला येथे मोठी मिरवणूक काढली जाते. या मंदिरात काचेवर रंगवलेली दशावताराची चित्रे पहायला मिळतात. मतकरी वाड्यातील ऑस्ट्रियन बनावटीच्या तीनशे वर्षापूर्वींच्या काचेच्या हंड्या आहेत.

या गावात  माघ पौर्णिमेला दोन दिवस यात्रा असते. या दिवशी बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे. नवमीच्या दिवशी मोठा उत्सव असतो. हिंगणे घराण्याचा पराक्रम, अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली मंदिरे, इंद्राचे दुर्मिळ मंदिर, जुने वाडे, नारायण महाराजांची संजीवन समाधी, नदीपात्रात असलेली आठ हेमांडपंती मंदिरे, टर्ले-जगताप वाडा, हिंगमिरे वाडा आणि बोहाड्याची परंपरा जपणारे हे गाव म्हणून पंचक्रोशित आेळखले जाते. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्‍वर येथेही इंद्राचे मंदिर आहे. 

गोदावरी नदीच्या पात्रात मंदिर आहे. ज्यावर्षी नदीपात्र कोरडे होते, त्याच वेळेस या मंदिरातील देवतांचे दर्शन होत असते. अशी आठ हेमांडपंती मंदिरे गावात आहेत चांदोरीची आणखी एक ओळख म्हणजे लोककलावंत माधवराव गायकवाड. लोकनाट्य क्षेत्रात आजही गायकवाडांचे नाव आदराने घेतले जाते. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके  हे स्वतः माधवराव गायकवाडांनी आपल्या चित्रपटात काम करावे म्हणून चांदोरीत आले होते. मात्र तमाशा हेच माझे जीवन असल्याचे सांगत  त्यांनी फाळकेंना चित्रपटात काम करण्यास  नकार दिला होता.

  गावात अनेक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. त्यामध्ये पूर्ण गाव सहभागी होताे आमच्या वाड्यातील ऑस्ट्रियन बनावटीच्या तीनशे वर्षापूर्वींच्या काचेच्या हंड्या दुर्मिळ आहेत वाडा बघण्यासाठी पर्यटक नेहमी भेट देत असतात.

- अश्विनी मतकरी (मतकरी वाडा)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Village