esakal | प्रयाग नदीच्या काठावरील घोरवडची वारकरी संप्रदायाची परंपरा 
sakal

बोलून बातमी शोधा

Live Photo

प्रयाग नदीच्या काठावरील घोरवडची वारकरी संप्रदायाची परंपरा 

sakal_logo
By
आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः प्रयाग नदीच्या तीरावर वसलेले घोरवड (ता. सिन्नर) गाव. सत्तराशेच्या आसपास लोकवस्ती असलेल्या गावात प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श झाल्याची अन्‌ भूमीत जटायू पक्ष्याचे वास्तव्य असल्याची अख्यायिका ग्रामस्थांकडून ऐकायला मिळते. गावात वडाचे शंभरहून अधिक जूने वृक्ष असल्याने गावाला घोरवड असे नाव पडल्याची मौखिक परंपरा सांगण्यात येते. एवढेच नव्हे, तर वारकरी संप्रदायाची परंपरा ग्रामस्थांनी पुढे नेत त्यामाध्यमातून काम उभे केले. 
गावालगतची म्हसळवाडी गावाचा एक भाग असून गावामध्ये शंकर, राम, हनुमान, दत्त, गणपती मंदिर आहे. गावात श्रीक्षेत्र प्रयागतीर्थ असून इथं प्राचीन बारव आहे. बुधनाजी महाराजांची समाधी आहे. चैत्र पौर्णिमेला भैरवनाथ यात्रा भरते. यावेळी बारा गाड्या ओढण्याचा सोहळा रंगतो. प्रयागतीर्थावर महाशिवरात्रनिमित्त यात्रा भरते. अखंड हरिनाम सप्ताह होतो. टेकडीवरील खंडेराव मंदिर गावात येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. ग्रामदैवत हनुमान मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. प्रयागनाथ प्रासादिक भजनी मंडळ आहे. हरिपाठ, काकडा होतो. वारकरी संप्रदायाचे निवृत्तीबुवा घोरवडकर हे संगीत विशारद असून सत्तरी ओलांडल्यानंतरही गावात ते संगीताचे धडे देतात. नाशिक शहरातून अनेक तरुण इथे येथे गाणे शिकण्यासाठी येतात. 

दोन घरामागे एक तरुण लष्करात 
शहीद जवान शंकर हगवणे यांचे स्मारक उभारण्यात आले असून गावातील पन्नास तरुण लष्करात भरती झालेत. देशसेवेसाठी दोन घरामागे एक तरुण लष्करात दाखल होत देशसेवा करत आहे. शिवाय गावात शिवस्मारक आहे. जलसंवर्धनाची कामे गावालगत झाली आहेत. शाहीर पांडूरंग उंबरे, पखवाज वादक निवृत्ती हगवणे आणि लोककला सादर करणारे वाघे मंडळ हे गावाचे वैशिष्ट्य आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. बोरखिंड धरणाचे पाणी पिण्यासाठी गावात आणले आहे. गावाच्या बाजूने समृद्धी महामार्ग गेला आहे. 

गावात अनेक कलावंत आहेत. मी गायन आणि चित्रकलेचा साधक आहे. गावातील शिवस्मारक मी स्वतः "डिझाईन' करून स्वतः रंगवून तयार केले. गावातील मुले वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहेत.
- किरण लोहकरे (चित्रकार) 

प्रयागतीर्थ च्या निमित्ताने गावात पर्यटक येत असल्याने अनेक कामे आम्ही हाती घेतली आहेत. पाणीयोजना राबवत असून शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. गावात सिमेंटचे रस्ते आणि सभामंडप अशी कामे झाली आहेत.
-रमेश हगवणे (सरपंच) 
 

loading image
go to top