मासे वाहतुकीच्या नावाखाली पिकअपमधून अवैध मद्यसाठा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

उत्पादन शुल्कच्या जिल्हा पथकाची कामगिरी : एकाला अटक 

नाशिक : परराज्यातील मद्यसाठ्याची वाहतूक करताना संशयितांनी नामी शक्कल लढविली खरी, परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चाणाक्ष जिल्हा भरारी पथकाने लाखोंचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. संशयितांनी मासे वाहतूक करणाऱ्या पिकअपच्या चेसीज्‌ वर काढलेल्या चोरकप्प्यातून विदेशी मद्याची वाहतूक केली जात असताना वाघेरा फाट्यावरील चेकपोस्टवर सदरचे वाहन पकडले. वाहनासह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत, वाहनचालकाला अटक केली आहे. 

उत्पादन शुल्कच्या जिल्हा पथकाची कामगिरी : एकाला अटक 

नाशिक : परराज्यातील मद्यसाठ्याची वाहतूक करताना संशयितांनी नामी शक्कल लढविली खरी, परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चाणाक्ष जिल्हा भरारी पथकाने लाखोंचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. संशयितांनी मासे वाहतूक करणाऱ्या पिकअपच्या चेसीज्‌ वर काढलेल्या चोरकप्प्यातून विदेशी मद्याची वाहतूक केली जात असताना वाघेरा फाट्यावरील चेकपोस्टवर सदरचे वाहन पकडले. वाहनासह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत, वाहनचालकाला अटक केली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सातत्याने भरारी पथकाद्वारे टेहाळणी केली जाते आहे. जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक मधुकर राख यांना परराज्यातील मद्यसाठ्याची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, भरारी पथकाने आज (ता.14) सकाळी हरसुल-गिरणारे रोडवरील वाघेरा फाट्यावर (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे नाकाबंदी करीत वाहनांची कसून तपासणी सुरू केली. त्यावेळी बोलेरो पिकअप वाहन (जीजे 14 एक्‍स 6393) आले असता, संशयित चालक फरीदभाई रखाभाई उनडजाम (37, रा. उमेज, ता. उना, जि. गिरसोमनाथ, गुजरात) याने मासे खरेदी करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानुसार, पथकाच्या अधिकाऱ्यांनी पिकअपच्या मागील बाजूस पाहिले असता त्यामध्ये मासे ठेवण्याचे धर्माकॉलचे रिकामे खोके होते. मात्र तरीही संशय आल्याने पथकाने जवळपास एक तास पिकअपची तपासणी केल्यानंतर चेसीजच्या वर असलेल्या बारीक चोर कप्प्यामध्ये अवैधरित्या विदेशी मद्याचा साठा लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. यात इम्पॅरियल व्हिस्की, ऑफिसर ब्ल्यु चॉईस, मॅकडॉवेल या विदेशी कंपनीच्या सीलबंद मद्यसाठा आणि पिकअप असा 10 लाख 5 हजार 520 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी भरारी पथकाचे निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रविण मंडलिक, अरुण सुत्रावे, धनराज पवार, विलास कुवर, सुनील पाटील, शाम पानसरे, मच्छिंद्र आहिरे, अनिता भांड यांच्या पथकाने बजावली. 

संशयिताची नामी शक्कल 
मालवाहू बोलेरो पिकअपमध्ये मासे वाहतूक करण्याचे थर्माकॉलचे रिकामे खोके होते. खोक्‍यांना माशांचा वास असल्याने संशय येण्याची शक्‍यता नव्हती. परंतु संशयिताने विदेशी मद्याच्या बाटल्या या पिकअपची चेसीज आणि मालवाहू जागेच्या मधोमध असलेल्या पोकळ जागेत चोरकप्पा बनविलेला होता. या चोर कप्प्यात विदेशी मद्याच्या बाटल्या खच्चून भरलेल्या होत्या. पथकाला मिळालेल्या खबरीनुसार त्याच वाहनातून अवैध मद्याची वाहतूक होत होती परंतु तासभर तपासणीनंतरही मद्य सापडत नव्हते. तसेच, पिकअपमध्ये माल नसतानाही वाहनाच्या चाकातील हवेचा दाब पाहता पथकाचा संशय बळावला होता. अखेर कप्प्याच्या लाकडी पाट्या तोडल्यानंतर आतमधील मद्याच्या बाटल्या दिसल्या आणि संशयितांच्या नामी शक्कलीला पथकानेही दाद दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-exise-crimenews