esakal | अपघातातील जखमी बीटमार्शल शिंदे यांची झुंज अपयशी 
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

अपघातातील जखमी बीटमार्शल शिंदे यांची झुंज अपयशी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोरच गस्तीवरून परतणाऱ्या दोघा पोलीस बीटमार्शलच्या दुचाकीला भरधाव वेगातील चारचाकी कारने धडक दिल्याची घटना रविवारी (ता.1) मध्यरात्री घडली होती. यात गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात मृत्युशी झुंज देणारे पोलीस हवालदार देविदास धोंडिराम शिंदे (47) यांची आज (ता.3) दुपारी प्राणज्योत मालवली. नाशिक पोलिसांकडून त्यांना जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मानवंदना देण्यात आली. तर, पोलीस कल्याणनिधीतून 2 लाख रुपयांचा धनादेश कुटूंबियांना प्रदान करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी नाशिकरोड पोलीसात कारचालक साहील ठाकरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस हवालदार देविदास शिंदे यांच्या व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्या भीषण अपघातामध्ये त्यांच्या मांडीचे हाड तुटले होते. खुबा आणि कमरेच्या मणक्‍याला फॅक्‍चर झाले होते. त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव मोठ्याप्रमाणात होऊन त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र आज (ता.3) दुपारी त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी रूग्णालयात जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. शिंदे यांच्यावर दहेगांव (ता. नांदगाव) येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. 
नाशिकरोड पोलीस ठाण्यात ते गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होते. गेल्या रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास गस्त आटोपून शिंदे व सहकारी राजाराम ठाले हे दुचाकीवरून उड्डाणपुलाखालून नाशिकरोड पोलीस ठाण्याकडे येत होते. त्याचवेळी बिटकोकडून भरधाव वेगातील टाटा नॅक्‍सॉन कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांनी पेट घेतला. तसेच, दोघा पोलिसांच्या डोक्‍यातील हेल्मेटही फुटले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात अपघाताच्या गुन्ह्यात वाढीव कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस कल्याणनिधीतून मदत 
पोलीसांच्या कल्याण निधीमधून देविदास शिंदे यांचय कुटूंबियांना दोन लाख रूपयांची तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली. जिल्हा शासकीय रूग्णालयात उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी मदतीच्या रकमेचा धनादेश सुपुर्द केला. तत्पूर्वी, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात त्यांना मानवंदना देण्यात येऊन मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी श्रद्धाजंली अर्पण केली. 

loading image
go to top