ड्राय-डे... एक्‍साईज-पोलिसांचे जागते रहो 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 October 2019

नाशिक : विधानसभा निवडणुकीचा शनिवारी (ता.19) सायंकाळी प्रचार संपला, तेव्हापासूनच दोन दिवस शहरासह राज्यात ड्राय-डे सुरू झाला. त्यामुळे या दोन दिवसात कोठेही मद्यविक्री करण्यास प्रतिबंध असणार आहे. परंतु मतदारांना भुलविण्यासाठी चोरट्या मार्गाने मद्याची विक्री होण्याची शक्‍यता लक्षात घेता, राज्य उत्पादन शुल्क व पोलीसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आत्तापर्यंत ड्राय-डेचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांना नोटीसा बजाविण्यात येऊन तपासणीही केली आहे. एकूणच पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून उद्या (ता.21) मध्यरात्रीपर्यंत जागते रहोचा खडा पहाराच द्यावा लागणार आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा कार्यालयाने आचारसंहिता काळात मद्यविक्रीची दैनंदिन माहिती घेण्यासाठी संकेतस्थळाचा वापर केला आहे. या संकेतस्थळावर विक्रेत्यांकडून आवश्‍यक ती माहिती रोजच्या रोज देणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याचे उल्लंघन करणाऱ्या तिघा विक्रेत्यांचे परवाने तात्पुरते स्थगितही करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे गेल्या तीन वर्षात ड्राय डेच्या दिवशी मद्यविक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या विक्रेत्यांची यादी करून त्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्यावर बारकाईने नजरही ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक करण्यात येऊन त्याची तपासणीही केली जात आहे. तर आचारसंहिता काळात बोरगाव (सुरगाणा), आंबोली (त्र्यंबकेश्‍वर) येथे सिमा तपासणी नाकेबंदी करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यात 15 विशेष भरारी पथके सतत फिरत होती. यातूनच या काळात 324 गुन्हे दाखल करीत, 1 कोटी 93 लाख 79 हजार 72 रुपयांचा अवैध मद्यसाठा व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तर 222 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik/dry-day/crimenews