esakal | "मुथूट' दरोडाप्रकरणात संशयितांविरोधात मोक्का 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

"मुथूट' दरोडाप्रकरणात संशयितांविरोधात मोक्का 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उंटवाडी रोडवरील मुथुट फायनान्सवर गेल्या जून महिन्यातील सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नातील संशयित टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हगारी कलमान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी स्वत: सदरच्या गुन्ह्यावर लक्ष केंद्रीत केले. गुन्ह्याची उकल झाल्यानंतर कुख्यात तीन दरोडेखोरांना अटक केली असून मुख्यसूत्रधारासह 11 जणांच्या टोळीवर मोक्काअन्वये कारवाई करीत सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हेगारांचा कोणताही पुरावा मागे नसताना नाशिक पोलीसांनी गुन्ह्याची उकल केली आहे. 

मुथुट फायनान्सच्या कार्यालयावर गेल्या 14 जून रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास सशस्त्र दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला. त्यावेळी संशयित दरोडेखोरांशी दोन हात करताना कार्यालयाच्या ऑडिटसाठी आलेला अभियंता सॅजू सॅम्युअल यांचा हकनाक बळी गेला. दोघा संशयितांनी त्यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून खून केला. त्यामुळे रिकाम्या हातीच दरोडेखोरांना पळ काढावा लागला. अत्यंत नियोजनबद्ध करण्यात आलेल्या दरोड्याच्या कटाचा कोणताही पुरावा मागे राहू नये, याची पुरेपूर दक्षता संशयितांनी घेतली होती. 
मात्र पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा आणि शहर पोलिसांनी अवघ्या दहाव्या दिवशी गुन्ह्यातील पहिल्या संशयिताला अटक केली आणि दरोड्याची उकल झाली. जितेंद्रसिंग विजय बहादूर सिंग (34, रा. अंबिका रोहाऊस, डिंडोली, सुरत, गुजरात. मूळ रा. रामपूर बैसान, ता. मछलीशहर, जि. जौनपूर. उत्तरप्रदेश), परमेंद्र उर्फ गौरविंसग राजेंद्र सिंह (31, रा. शिवशक्ती रेसीडेन्सी, बरेली, कडोदरा, सुरत, गुजरात. मूळ रा. तिलसवा, राजापूर, माहेंबदाबाद, जि. माऊ. उत्तरप्रदेश), आकाशसिंग विजय बहादूर सिंग (30, रा. रामवूर, दान, मोगराबादशाह, ता. मछलीशहर, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) या तिघांना अटक केले. त्यानंतर मुख्यसूत्रधार फायनान्स कार्यालयावर दरोडे टाकण्यातील अट्टल दरोडेखोर सुबोधसिंह इश्‍वरीप्रसाद सिंह (35, रा. चिश्‍तीपूर, ता. चण्डी, जि. नालंदा, बिहार) असल्याचे समोर आले असून सध्या तो बिहारमधील बेऊर मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याच्यासह या दरोड्यात 11 संशयितांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. 
त्यानुसार, नाशिक पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून मोक्काअन्वये कारवाई केली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या महिन्या मुंबईत झालेल्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीतही या गुन्ह्याच्या तपासासंदर्भातील सविस्तर माहिती पोलीस आयुक्तांनी दिली असता, नाशिक पोलिसांचे विशेष कौतूक करण्यात आले होते. 

loading image
go to top