Unique Activity : अलाणेत विधायक निर्णय; भाग्यलक्ष्मी अन्‌ माहेरची साडी योजना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women

Unique Activity : अलाणेत विधायक निर्णय; भाग्यलक्ष्मी अन्‌ माहेरची साडी योजना!

धुळे : गाव विकासाला दिशा देतानाच महिला सक्षमीकरणाचा (Women Empowerment) उद्देश बळकट होण्यासाठी अलाणे (ता. शिंदखेडा) येथील सरपंच अरुणाबाई कोमलसिंग गिरासे यांनी विधायक आणि अनोखा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. (Sarpanch Bhagya Lakshmi Abhiyan and Maherchi Sadi Yojana initiative to encourage women by sarpanch dhule news)

त्यांनी सरपंच भाग्यलक्ष्मी अभियान आणि सरपंच माहेरची साडी योजना सुरू करत महिला वर्गास प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.

गाव विकासासह विधायक कार्यात अलाणे ग्रामपंचायत विविध उपक्रमांद्वारे योगदान देत असते. यात सरपंच अरुणाबाई गिरासे यांच्या पुढाकाराने अनोखा ठराव अलाणे ग्रामपंचायतीने केला आहे. यानुसार सरपंच भाग्यलक्ष्मी अभियान आणि सरपंच माहेरची साडी योजना सुरू करण्यात आली आहे.

महिला सक्षमीकरणाला चालना देताना आपल्यास्तरावर काय करू शकतो, गावातील मुली व महिलांना कसा फायदा होऊ शकेल या विचारातून सरपंच गिरासे यांनी सरपंच भाग्यलक्ष्मी अभियान आणि सरपंच माहेरची साडी योजना अमलात आणली आहे.

प्रोत्साहनपर रकमेची भेट

अलाणे गावातील मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी सरपंच भाग्यलक्ष्मी अभियानांतर्गत ग्रामपंचायतीकडून सूनबाईला अकराशे रुपये प्रोत्साहनपर दिले जाणार आहेत.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

तसेच अलाणेतील मुलगी विवाहानंतर सासरी जाताना ग्रामपंचायतीकडून माहेरची भेट म्हणून अकराशे रुपयांची पैठणी साडी भेट दिली जाणार आहे. या विधायक उपक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.

शेतकरी अर्धांगिनी योजना

स्व. आनंदसिंग प्रतापसिंग गिरासे व स्व. फकीरा देवचंद कोळी यांच्या कार्य सन्मानार्थ सरपंच शेतकरी अर्धांगिनी योजनाही हाती घेण्यात आली आहे. अलीकडे शेतकरी नवरदेवाकडे वधू पित्याने पाठ फिरवली आहे. ही स्थिती प्रत्येक खेडेगावात दिसून येते. अनेकांचा कल हा नोकरदार जावयाकडे दिसतो. आपली मुलगी शहरात वास्तव्यास असली पाहिजे या कारणामुळे शेतकरी नवरदेवाकडे वधू पित्याने पाठ फिरवली आहे.

असा दृष्टिकोन बदलावा म्हणून अलाणे ग्रामपंचायतीने शेतकरी अर्धांगिनी योजना सुरू केली आहे. यात जी मुलगी अलाणे येथील शेतकरी मुलाशी विवाह करेल, त्या मुलीला ५ हजार ५५५ रुपयांचे संसारोपयोगी साहित्य, वस्तू भेट दिल्या जातील. शेतकरी मुलास या योजनेचा लाभ दिला जाईल. योजनेसाठी सरपंच अरुणाबाई गिरासे व सदस्य, सरपंच प्रतिनिधी संदीप गिरासे, ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.

टॅग्स :Dhulewomen empowerment