नैराश्‍यग्रस्त तरुणांना 'शलाका'चा आधार! 

चेतना चौधरी
शनिवार, 12 जानेवारी 2019

धुळे : मित्रमैत्रिणींमधील हसतमुख बालमैत्रिणीने नैराश्‍यातून आत्महत्या केली. तिची अशी "एक्‍झिट' मनाला चटका लावून गेली. अशावेळी तिच्या आत्महत्येचा शोध घेताना विविध कारणांमुळे नैराश्‍याकडे लोटल्या जाणाऱ्या युवक, तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून संवेदनशील केतकी म्हसकरने शलाका व्यक्तिमत्त्व विकास आणि समुपदेशन केंद्राची स्थापना केली. याद्वारे युवा पिढीचे प्रबोधन, जनजागृतीसाठी मित्रमैत्रिणींचा ग्रुप सरसावला आहे. युवा दिनानिमित्त या मित्रमैत्रिणींचे कार्य इतरांसाठी प्रेरक ठरणारे आहे. 

दुःख उगाळण्यासह रडून प्रश्‍न सुटणार नाही, तर नैराश्‍य डोकविणाऱ्या तरुणांना चुकीचे विचार, टोकाचे पाऊल उचलण्यापासून प्रवृत्त करणे महत्त्वाचे ठरते. त्यांचे वेळेत समुपदेशन झाले तर यशापयश सहज पचविता येणे शक्‍य आहे. या उद्देशातून आणि प्रबोधनात्मक, विधायक कार्याची कास धरत उपक्रमशील मित्रमैत्रिणींच्या ग्रुपने शलाका व्यक्तिमत्त्व विकास केंद्राची निर्मिती केली. 

सकारात्मक प्रतिसाद 
नैराश्‍य, आत्महत्येमागची कारणे लक्षात येण्यासाठी संशोधक विद्यार्थी केतकी म्हसकरने मानसशास्त्र विषय निवडला. तिने सुजय भालेराव यांच्या सहकार्याने शलाका व्यक्तिमत्त्व विकास केंद्र सुरू केले. नैराश्‍यग्रस्त युवक, तरुण-तरुणींना समुपदेशनातून आशेचा नवा किरण दाखविण्याचा प्रयत्न म्हसकर, भालेराव करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद लाभला आणि अनेक नैराश्‍यातून बाहेर पडत आहेत. हेच "शलाका'चे यश ठरत आहे. 

नैराश्‍याची विविध कारणे 
पौगंडावस्थेपासून बळावणारे नैराश्‍य माता-पित्याकडून प्रेम मिळाले नाही, प्रेमात वाहत जाणे आणि प्रेमभंग, विरह, करिअरचा प्रश्‍न, शिक्षणातील अपयशामुळे अधिक गडद होते. अशा विचारांच्या कोलाहलात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास नैराश्‍यग्रस्त तरुण मागे- पुढे पाहत नाहीत. अशा तरुणांचे मन सशक्त करणे, त्यांच्यात संकटांवर मात करण्याजोगा दृढ आत्मविश्‍वास पेरण्याचे कार्य शलाका व्यक्तिमत्त्व विकास केंद्र करत आहे. 

कार्यशाळेवरही भर 
मार्गदर्शक म्हसकर, भालेराव यांना शिवांजली सापे, मल्हार सापे, तेजश्री कौशिक, राहुल मंगळे, कुणाल खैरनार आदींचे पाठबळ लाभत आहे. ते ताणतणावातून मुक्त कसे व्हावे, सुसंवादाचे लाभ, पालकांची भूमिका, अशा ज्वलंत विषयांवर प्रत्येक आठवड्यात कार्यशाळेद्वारे प्रबोधन करतात. जोडीला त्यांनी व्यसनाधीनतेपासून तरुणांना परावृत्त करण्याचा विडा उचलला आहे. 

महाविद्यालयीन कालावधीत मैत्रिणीच्या आत्महत्येमुळे मानसशास्त्राचा अभ्यास आणि कारणांची उकल करण्याची इच्छाप्रकट झाली. पुढे निश्‍चयाने शलाका व्यक्तिमत्त्व विकास आणि समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून तरुणांसाठी कार्य उभे केले. 
- केतकी म्हसकर, मार्गदर्शक 
शलाका विकास केंद्र, धुळे

Web Title: Shalaka center helps depressed youth