व्यवस्थापनाचे "विद्यापीठ' शेगाव येथील श्रीगजानन महाराज संस्थान 

अमोल भट
बुधवार, 1 जानेवारी 2020

जळगाव : विदर्भातील पंढरी म्हणून लौकिकप्राप्त श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानाने आपल्या उत्कृष्ट व्यवस्थापनातून सेवाकार्याचा दीप अखंडित तेवत ठेवला आहे. आध्यात्मिक कार्यासोबत सेवाकार्य अविरत सुरू ठेवत अद्वितीय अभ्यासक्रम आणि संस्थानातील सेवा अनुभवातून "वारकरी' घडविण्याचे कामही संस्थानकडून सुरू आहे. 

जळगाव : विदर्भातील पंढरी म्हणून लौकिकप्राप्त श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानाने आपल्या उत्कृष्ट व्यवस्थापनातून सेवाकार्याचा दीप अखंडित तेवत ठेवला आहे. आध्यात्मिक कार्यासोबत सेवाकार्य अविरत सुरू ठेवत अद्वितीय अभ्यासक्रम आणि संस्थानातील सेवा अनुभवातून "वारकरी' घडविण्याचे कामही संस्थानकडून सुरू आहे. 

लौकिकार्थाने कोणत्याही विद्यापीठाची डिग्री न मिळवता, एखाद्या विदेशी विद्यापीठातून "एमबीए'च्या व्यवस्थापन कौशल्यालाही मान खाली घालायला लावेल, असं उत्कृष्ट नियोजन ही शेगाव संस्थानाची खासियत आहे. केवळ सेवाभावनेनं चालणारं आणि श्रद्धाभावनेच्या बळावर उभं राहिलेल्या संस्थानाची पथदर्शी वाटचाल ही केवळ कालपरवाची गोष्ट नव्हे, तर तब्बल 100 वर्षांपासून चालत आलेली महत्तम परंपरा आहे. 

42 प्रकल्पांतून सेवाकार्य 
लोककल्याणकारी कार्य संस्थानाच्या एकूण 6 शाखांच्या नियोजनबद्ध स्वयंशिस्त,काटेकोर व्यवस्थापनातून जगासमोर येत आहे. संस्थानचं शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य, संस्थानमार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध माध्यमांच्या शाळा, भव्य इंजिनिअरिंग कॉलेज, वैद्यकीय सुविधा, संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात 13 तालुक्‍यात राबवण्यात येणारी ग्रामीण आरोग्य सेवा योजना, अपंग पुनर्वसन संस्था, आरोग्य शिबिरे, आदिवासी शैक्षणिक प्रकल्प, वारकरी प्रशिक्षण शिबिर, वारकरी शिक्षण संस्था, असे एकाहून एक सरस उपक्रम अविरत, शिस्त व नियोजनबद्धरीत्या सुरू आहेत. 

वारकरी शिक्षण संस्था 
सन 1967 मध्ये वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू मामासाहेब दांडेकर यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेची स्थापन झाली. संत वाङ्‌मयातील तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा, जनमानसांमध्ये भागवत भक्तीची, नीती धर्माची ज्ञानज्योत तेवत राहून समाज व्यसनमुक्त व्हावा ,पारमार्थिक संस्कार घडून संस्थेत शिक्षण घेतलेल्या प्रवचनकार, कीर्तनकार त्यांनी याच माध्यमातून लोकांचे आत्मकल्याण साधावे याच सद्‌उद्देशाने वारकरी शिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. संस्थानद्वारा वारकरी शिक्षण संस्थेसारख्या अद्वितीय अभ्यासक्रमातून "उद्याचा वारकरी' घडविला जात आहे. 

25 हजार सेवेकरी 
25 हजार सेवेकरी संस्थानमध्ये भक्तांची सेवा करून व "श्रीं'चरणी आपली सेवा समर्पित करण्यासाठी येतात. कर्मयोगी शिवशंकरभाऊच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे संस्थानचा कारभार शंभर टक्के पारदर्शक असा आहे. स्वत: भाऊ किंवा कोणीही ट्रस्टी संस्थानमधील पाणीही पित नाहीत. जेवणाचा डबा घरून आणतात. एकही पैसा मानधन न घेता ते काम करतात. त्यात आबालवृद्ध, गावखेड्यातील मुलामाणसांपासून नोकरदार, बड्या कंपन्यांमधील अधिकारीही असतात. हजारो सेवेकरी सेवेची संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत संस्थानच्या इच्छुक सेवेकऱ्यांच्या प्रतीक्षा यादीत असतात. 

अशी सेवा, असे कार्य 
श्रीगजानन महाराज ग्रामीण आरोग्य सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 38 हजार 780 अधिक गरजू व शेतकरी रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया, ऍलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधोपचाराचा कोट्यवधी रुग्णांना लाभ, 
संस्थानाच्या शेगाव, पंढरपूर, श्रीक्षेत्र आळंदी शाखांद्वारे 18 हजार 230 गावांना टाळ, मृदंग, वीणा, तसेच संत वाड:मयाचे वाटप, संस्थांनातर्फे सर्व अधिकृत शाखांमध्ये तीन हजार खोलींद्वारा सुसज्ज भक्तनिवास, 
सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत रोज 45 हजार भक्तांना मिष्टान्नासह विनामूल्य महाप्रसादाचे वितरण. यासह 
पर्यावरण समतोल राखण्यासाठी परिसरात दोन लाखांवर रोपांचे वृक्षारोपणासह संवर्धन. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shegav santhan menegment univarcity