धुळे- महापालिका ढोल बजाओ अभियानाद्वारे करवसुलीच्या नावाखाली धुळेकरांना बेअब्रू करण्याचे कारस्थान करीत आहे. शहरात एक काम धड केलेले नाही. महापालिकेत बेबंदशाही कारभार आणि गैरकारभाराची दृष्ट लागली. त्यात मालमत्ता करवसुलीसाठी धुळेकरांच्या घरासमोर ढोल बडविण्याचा तमाशा केला जात असल्याचा आरोप आहे. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त कारभार करून दाखविल्याशिवाय धुळेकरांनी कर भरणा कशासाठी करावा, असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गुरुवार (ता. २७)पासून महापालिका अधिकाऱ्यांच्या घरासमोर प्रति ढोल बजाओ आंदोलन सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.